
>> सुनील हिंगणे
फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते. महाशिवरात्र हे शिव आणि शक्तीच्या मिलनाचे महापर्व आहे. शंकराच्या आराधनेसाठी केल्या जाणाऱया सर्व व्रतवैकल्यांमध्ये महाशिवरात्रीचे स्थान सर्वोच्च मानले गेले आहे.
फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते. हिंदू धर्मग्रंथांमधील उल्लेखांनुसार, भगवान शंकराला प्रत्येक महिन्याची चतुर्दशी प्रिय आहे. परंतु संपूर्ण वर्षभरात फाल्गुन महिन्यातील चतुर्दशी शंकराला अतिप्रिय आहे, असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या पर्वाचे महत्त्व सर्व पुराणांमध्ये सांगितले आहे. शिवरात्रीच्या संदर्भात केवळ एकच कथा नसून अनेक कथा सांगितल्या जातात. परंतु सर्व कथांचे स्वरूप आणि वर्णनशैली एकसमान आढळते.
महाशिवरात्र हे शिव आणि शक्तीच्या मिलनाचे महापर्व आहे. फाल्गुनमासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या रात्री आदिदेव भगवान शिव कोट्यवधी सूर्यांच्या तेजाइतक्या महातेजस्वी लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले, असा उल्लेख ईशान-संहितेत आहे. शिवपुराणाच्या विद्येश्वर संहितेतील कथेनुसार, शंकराच्या निष्कल म्हणजे निराकार स्वरूपाचे प्रतीक असणारे लिंग याच पवित्र तिथीला प्रकटले आणि सर्वप्रथम ब्रह्मा आणि विष्णू यांनी त्याची पूजा केली होती. त्यामुळेच ही तिथी शिवरात्र या नावाने प्रसिद्ध झाली. जो भक्त महाशिवरात्रीला उपवास करून, इंद्रियांवर विजय मिळवून पूर्ण शक्ती आणि सामर्थ्यानिशी निश्चल भावनेने भगवान शंकराची पूजा करतो, त्याला संपूर्ण वर्षभर शिवपूजा केल्याचे फळ एकट्या महाशिवरात्रीच्या पूजेने मिळते, अशी मान्यता आहे. शंकराच्या आराधनेसाठी केल्या जाणाऱया सर्व व्रतवैकल्यांमध्ये महाशिवरात्रीचे स्थान सर्वोच्च मानले गेले आहे. स्कंदपुराणात या महाव्रताची महती वर्णन करताना म्हटले आहे की, हे शिवरात्रीचे व्रत परात्पर आहे. म्हणजेच, यासारखे दुसरे अन्य व्रत असू शकत नाही. माघ महिन्यातील पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात जी चतुर्दशी येते, ती रात्र म्हणजेच शिवरात्र होय. त्या दिवशी सर्वव्यापी भगवान शंकर सर्व शिवलिंगांमध्ये विशेष रूपाने संचार करतात. या जगात जी चल आणि अचल शिवलिंगे आहेत, त्या सर्वांमध्ये या रात्री शिव आणि शक्तीचा संचार होतो. त्यामुळेच या रात्रीला शिवरात्र असे म्हणतात.
महाशिवरात्रीच्या व्रतात उपवासाला महत्त्व आहे. यावेळी रुद्रपठण आणि रुद्राभिषेकालाही मोठे महत्त्व आहे. शिवरात्रीच्या चारही प्रहरांमध्ये पृथक पूजनाला विशेष महत्त्व आहे. पुराणात दिलेल्या माहितीनुसार, शिवरात्रीचे व्रत केवळ शैवच नव्हे तर वैष्णव, शाक्त, गाणपत्य, सौर अशा सर्व संप्रदायाच्या व्यक्तींसाठी अनिवार्य आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही महाशिवरात्रीचे महत्त्व मोठे आहे. या तिथीला चंद्रकोर क्षीण असते. सृष्टीला ऊर्जा देण्याचे सामर्थ्य चंद्रामध्ये उरत नाही. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. त्यामुळेच चंद्राच्या कलेप्रमाणे मनाचे भाव कमी-जास्त होत असतात. चंद्र हा भगवान शंकराच्या डोक्यावर वास करतो. म्हणूनच चंद्राची कृपादृष्टी प्राप्त करायची असल्यास शंकराची पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या वेळी सूर्यही उत्तरायणात असतो. हीच ऋतुबदलाचीही वेळ असते. वसंत ऋतू उंबरठ्याशी असतो.
भगवान शंकरांनी याच दिवशी ब्रह्मारूपातून रुद्ररूपात प्रवेश केला, असेही एक कथा सांगते. या दिवशी भगवान शंकर तांडव करून तसेच आपला तिसरा नेत्र उघडून संपूर्ण विश्वाचा नाश करतात, अशीही आख्यायिका आहे. त्यामुळेच महाशिवरात्रीला कालरात्री असेही म्हणतात. अनेक ग्रंथांत शिवरात्रीच्या वेगवेगळ्या आराधना सांगण्यात आल्या आहेत. अनेक प्रकारांची अनुष्ठाने या दिवशी केली जातात. हिंदू कॅलेंडरनुसार, बारा शिवरात्री असतात आणि त्यातील एक महाशिवरात्र असते. माघ महिन्याच्या शेवटी ही चतुर्दशी येते आणि तेथूनच फाल्गुन मासारंभ होतो. हाच भगवान शंकराचा प्रिय दिवस असून, त्या दिवशी शिवाची आराधना केल्याने पुण्यफल मिळते, असे सांगितले जाते.
(लेखक अध्यात्म अभ्यासक आहेत.)




























































