
कल्याण-डोंबिवली महापालिका आस्थापनेवरील सेवानिवृत्त आणि मृत सफाई कामगारांच्या 51 वारसांची अनुकंपातत्त्वावर भरती करण्यात आली आहे. ही भरती करण्याची शिफारस लाड-पागे समितीने केली होती. त्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले.
महापालिकेच्या सेवेत असलेल्या सेवानिवृत्त आणि मृत सफाई कामगारांच्या वारसांची अनुकंपातत्त्वावर भरती करण्यात यावी, अशी शिफारस लाड-पागे समितीने केली होती. त्यानुसार ही भरती करून संबंधितांना नियुक्तापत्रे देण्यात आली. याप्रसंगी महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले आणि महापालिका आयुक्त अभिनव गोयल, सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे, महापालिका सचिव किशोर शेळके, सहाय्यक आयुक्त सुषमा मांडगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. नियुक्ती आदेश स्वीकारणाऱ्या लाभार्थ्यांना शुभेच्छा देताना महापौर हर्षाली चौधरी यांनी महापालिकेच्या सेवेत कार्यरत राहून शहराच्या स्वच्छता व विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले. ही संधी जबाबदारीची असून नागरिकांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले. वर्षभरात एकूण २३२ वारसांना नियुक्तीपत्रे प्रदान केली आहेत. तसेच वारसाहक्कासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी दोन वेळा विशेष मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे नियुक्ती प्रक्रिया अधिक सुलभव पारदर्शक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया उपायुक्त वंदना गुळवे यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्षमता, शिस्तीवर भर द्या
नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठा, कार्यक्षमता आणि शिस्त या तत्त्वांवर काम करून महापालिकेच्या सेवेला अधिक बळ द्यावे. शहराच्या सर्वांगीण विकासात प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान महत्त्वाचे आहे. ही नोकरी म्हणजे तुम्हाला कल्याण आणि डोंबिवलीकरांची सेवा करण्याची मिळालेली संधी आहे. या संधीचे तुमच्याकडून सोने केले जावे, असे यावेळी महापालिका आयुक्त अभिनव यादव यांनी व्यक्त केले.



























































