
साताऱयाची ठेंगणी राधा सध्या बीडच्या परळीत सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. सामान्यपणे धिप्पाड शरीरयष्टीसाठी ओळखल्या जाणाऱया म्हशींच्या जगात राधाने आपल्या इवल्याशा रूपाने चक्क गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरलेले आहे. साताऱयातील ही अद्वितीय म्हैस परळी येथील महापशुधन एक्सपोमध्ये दाखल झाली होती. तिला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
परळीत तहसील कार्यालयासमोरील विस्तीर्ण मैदानावर भरलेल्या या एक्सपोमध्ये राज्यासह देशभरातील विविध दर्जेदार पशुधनाच्या जाती सहभागी झाल्या आहेत. मात्र, या सर्वांमध्ये बुटक्या राधाने भाव खाल्ला. या विक्रमी म्हशीसोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी झाली.
उंची 2 फूट 8 इंच
मुरा जातीची ही राधा दिसायला अत्यंत देखणी आणि आटोपशीर आहे. तिची उंची अवघी 2 फूट 8 इंच असून तिचे वजन 290 किलो इतके आहे. सध्या तिचे वय 3 वर्षे 6 महिने आहे. तिच्या या वैशिष्टय़पूर्ण शारीरिक रचनेमुळेच तिची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे.
बुटक्या राधाला खरेदी करण्यासाठी सध्या तब्बल 75 लाख रुपयांची मागणी आली होती.



























































