
भिवंडीत सर्वाधिक ३० जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने महापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. तर १२ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला उपमहापौरपद देण्याचे ठरले होते. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीने गुगली टाकत आपला अर्जच दाखल केला नाही. त्यामुळे काँग्रेस सत्तेची ४६ ही मॅजिक फिगर गाठणार कशी याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला ३० तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला १२ जागेवर यश मिळाले. दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र गट स्थापन करून महापालिकेवर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तारिक मोमीन यांनी महापौर पदासाठी आज उमेदबारी अर्ज दाखल केला, तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या इशा इमरान खान या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होत्या. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणताही उमेदवार दिला नसल्याने काँग्रेसचे स्थानिक नेते पेचात पडले आहेत.
यांनी केले अर्ज दाखल महापौरपदासाठी कोणार्क
विकास आघाडीचे विलास पाटील, मयुरेश पाटील, प्रतिभा पाटील तर भाजपचे नारायण चौधरी, स्नेहा पाटील आणि शिंदे गटाकडून बाळाराम चौधरा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे तारिक मोमीन, शिंदे गटाचे अस्मिता नाईक, सुहास नकाते यांनी अर्ज दाखल केले आहेत.






























































