तेल, साबण, बिस्किट महागणार! कच्च्या मालांच्या किंमतीत वाढ, रुपयातील घसरणीचा फटका बसणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मध्ये कपात झाल्यानंतर ग्राहकांना वस्तूंच्या किंमतीत मोठा दिलासा मिळाला होता. आता अनेक महिने संयम बाळगल्यानंतर, देशातील वेगवेगळ्या वस्तू बनवणाऱया पंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कच्च्या मालांच्या किंमतीमध्ये झालेली वाढ आणि रुपयांमध्ये होत असलेल्या सततच्या घसरणीमुळे  उत्पादकांना कमी नफा मिळत आहे. त्यामुळे त्यांनी वस्तूंच्या किमतीत 5 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यास सुरुवात केली आहे. डिटर्जंट आणि हेअर ऑइल पासून चॉकलेट, बिस्किट, नूडल्स आणि धान्यांपर्यंत, रोजच्या वापरातील काही निवडक वस्तू या तिमाहीत वाढलेल्या किमती सह दुकानांमध्ये पोहोचू लागल्या आहेत. त्यामुळे या वस्तूंसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

नाश्त्याचे पदार्थ आणि ओट्स बनवणारी कंपनी बॅग्रीझचे ग्रुप डायरेक्टर आदित्य बागडी यांनी सांगितले. ‘आम्ही या तिमाहीत निवडक पॅकेटच्या किमतीत किरकोळ वाढ करण्याचा विचार करत आहोत. साबण, शॅम्पू, डिटर्जंट आणि पर्सनल केअर उत्पादने बनवणारे कच्चे तेलावर आधारित उत्पादनांवर खूप अवलंबून असतात, ज्याचा परिणाम लिक्विड पॅराफिन आणि सर्फेक्टंटसारख्या संबंधित वस्तूंवरही होतो. हिंदुस्थान युनिलिव्हरचे सीएफओ निरंजन गुप्ता यांनी गेल्या आठवडय़ात गुंतवणूकदारांसोबतच्या बैठकीत सांगितले होते की, होम केअर उत्पादनांच्या किमतीत लवकरच वाढ दिसून येईल. काही वस्तू आधीच बाजारात आल्या असून आणखी काही लवकरच येतील, असे गुप्ता म्हणाले. कंपनी आपल्या होम केअर सेगमेंटमधील सर्व उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या प्रक्रियेत आहे, ज्यात सर्फ एक्सेल, रिन, विम आणि डोमेक्स यांचा समावेश आहे. रियल ज्यूस आणि वाटिका हेअर ऑइल बनवणारी कंपनी डाबर चालू असलेल्या चौथ्या तिमाहीत किमतीत 2 टक्के वाढ करत आहे.

खाद्यतेलाच्या किमती उसळल्या

वस्तूंच्या वाढत्या खर्चामुळे आणि रुपयावरील दबावामुळे किमतीत वाढ झाली आहे. अलीकडच्या काही आठवडय़ांमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे  सल्फर आणि एनपॅराफिनसारख्या संबंधित वस्तूंच्या खर्चातही वाढ झाली आहे, तर नारळाच्या तेलाच्या किमती गेल्या एका वर्षात दुप्पट झाल्या आहेत. रुपयातील घसरणीमुळे आयात खर्च आणखी वाढला आहे. चलन अनेक महिन्यांपासून सतत घसरत आहे.