
पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी बँक ऑफ बडोदाने आपल्या खातेदारांना एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. या सूचनेमध्ये बँकेने म्हटले की, फोन, व्हॉट्सअॅप आणि एसएमएसवर आलेल्या फ्रॉड आणि मेसेजपासून सावध राहावे, असे बँकेने म्हटले आहे. बँकेने खास आपल्या खातेदारांना, विशेष करून ज्येष्ठ नागरिक, पेन्शनधारक आणि माजी कर्मचाऱ्यांनी ऑनलाईनवरून येणाऱया मेसेज आणि फेक पेन्शनर कार्डसंबंधी नेहमी अलर्ट राहावे, अशा सूचना केल्या आहेत. जर अशा कोणत्याही प्रकारचा मेसेज मोबाईलवर आला त्याला रिप्लाय करू नका. थेट बँकेत येऊन यासंबंधी चौकशी करावी, असा सल्ला दिला आहे. बँकेने यासंबंधीची सविस्तर सूचना एक्सवर शेअर केली आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेले कोणतेही पेन्शनर कार्ड किंवा ऑफर बँकेची अधिकृत नाही, असे बँक ऑफ बडोदाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अलर्ट राहा!
खातेधारकांनी फेक पेन्शनर कार्डवर विश्वास ठेवू नये, ओटीपी, पिन, सीव्हीव्ही, आधार, पॅन किंवा बँक डिटेल्स कोणालाही सांगू नये, पेन्शन अपडेट किंवा व्हेरिफिकेशनच्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये, बँक अधिकारी किंवा सरकारी कर्मचारी असल्याचा कोणी दावा करत असेल तर बँकेत येऊन याची माहिती द्यावी, बँक ऑफ बडोदा कोणत्याही ग्राहकांकडे व्हॉट्सअॅप किंवा एसएमएस करून कोणतीही गोपनीय माहिती मागत नाही. त्यामुळे अज्ञातांनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका, असे बँकेने म्हटले आहे.



























































