पायलटच्या मदतीने अजितदादांचा घात! प्रमाणापेक्षा जास्त इंधन भरल्यामुळेच स्फोट, रोहित पवार यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात नव्हे तर पायलटचा वापर करून त्यांचा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घातपात केला गेला असावा असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज केला. प्रसारमाध्यमांसमोर सादरीकरण करत अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा त्यांनी केला. प्रमाणापेक्षा जास्त इंधन भरल्यामुळेच विमान कोसळताच एकापाठोपाठ मोठे स्पह्ट झाले असा दावा करतानाच, अपघातानंतर कागद जळले नाहीत मग अतिसुरक्षित ब्लॅक बॉक्स कसा जळाला, असा सवाल त्यांनी केला.

रोहित पवार यांनी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबद्दल कासवगतीने सुरू असलेली चौकशी, व्हीएसआर कंपनीवर कारवाईत होत असलेली टाळाटाळ, अपघाताच्या 20 दिवसांनंतरही तपास यंत्रणांचा अहवाल न येणे आदी अनेक बाबींवर त्यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे पोलखोल केली.

स्पह्ट घडवण्यासाठीच विमानाच्या इंधन टाक्या फुल केल्या

चेंडू मऊ मातीत पडला तर कमी उसळी घेतो, पण कठीण रस्त्यावर पडला तर जास्त उडय़ा घेतो, त्याचप्रमाणे अजितदादांचे विमान धावपट्टीवर न पडता कठीण पृष्ठभागावर आदळल्याने धक्का अधिक तीव्र झाला असे रोहित पवार म्हणाले. अपघातानंतर मोठे स्पह्ट झाले, कारण विमानात प्रमाणापेक्षा जास्त इंधन भरण्यात आले होते, असे ते म्हणाले.

मुंबईहून बारामतीकडे जाताना इंधनाच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरल्या गेल्या, मात्र बारामतीला पोहोचल्यानंतर विमान पुढे जाणार होते, तर मुंबईतच टाक्या फुल करण्याची काय गरज होती? महाराष्ट्रात इंधन स्वस्त आहे म्हणून ते भरले असेल तर गुजरातमध्ये त्याहून स्वस्त इंधन उपलब्ध होते, असा युक्तिवादही रोहित पवार यांनी मांडला.

कमी अंतराच्या प्रवासासाठी इंधनाच्या टाक्या पूर्ण भरण्याचा निर्णय का घेतला गेला अशी शंका उपस्थित करतानाच, स्पह्टाची तीव्रता वाढावी म्हणून तसे केले गेले असावे, असे रोहित पवार म्हणाले. या सर्व गोष्टी पाहता हा अपघात नसून नियोजित कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा ठाम दावा त्यांनी केला.

न वितळणाऱ्या धातूंमध्ये बसवलेला ब्लॅक बॉक्स जळलाच कसा?

विमानातील ब्लॅक बॉक्स, व्हॉईस रेकॉर्डरचे नुकसान झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावरूनही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. 1100 डिग्री तापमानामध्ये तासभर जरी ब्लॅक बॉक्स राहिला तर थोडेफार नुकसान होते. सहा हजार मीटर खोलीपर्यंत पाण्याचे प्रेशर असते तितके असले तरी ब्लॅक बॉक्सला काहीच होत नाही, असे तज्ञ सांगतात. अपघातानंतर विमानातील तांब्याच्या केबल्स तशाच्या तशा आहेत. विमानासाठी वापरले जाणारे टायटॅनियम 1670 अंश डिग्री तापमान सहन करू शकते, अॅल्युमिनीयमही विमानात वापरले जाते. त्यामध्ये सुरक्षित बसवलेला ब्लॅक बॉक्स कसा जळला, 90 कोटी खर्च करून अलीकडेच नागरी उड्डाण मंत्र्यांनी अद्ययावत प्रयोगशाळेचे उद्घाटन केले, मग ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी परदेशात का पाठवला जातोय, असे रोहित पवार म्हणाले.

रोहित सिंग अमेरिकेत पळाला

व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचा मुलगा पायलट रोहित सिंग हा अपघात झाल्यानंतर अमेरिकेत पळाला. त्यांची दुबई आणि अमेरिकेत कंपनी आहे. अपघात झाला त्या विमानाचा मालकच हिंदुस्थानात नाही. त्याला बाहेर जाण्यासाठी कोणी मदत केली? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.

भाजपचे लोक पैसे देऊन ट्रोल करताहेत

रोहित पवार यांनी यावेळी त्यांना ट्रोल करणाऱ्या सुमित ठक्कर याचाही उल्लेख केला. ठक्कर याचे भाजपशी संबंध असून भाजपचे लोक त्याला पैसे देऊन ट्रोल करायला लावताहेत असा आरोप रोहित पवार यांनी केला. 28 तारखेच्या घटनेच्या दोन दिवसआधी ‘महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होईल’ असा संदेश ठक्करने सोशल मीडियावर टाकला होता आणि काही मिनिटांतच हटवला होता असे सांगत त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे रोहित पवार म्हणाले.

राहुल गांधी यांचा चौकशी समितीमध्ये समावेश करा

अजितदादांच्या अपघाताबाबत सुरू असलेल्या चौकशीसाठी मॉनिटरिंग कमिटी बनवा. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसल्याने त्या समितीमध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासही दोन्ही बाजूंचे काही खासदार, राष्ट्रवादीचे काही नेते आणि एका न्यायमूर्तींचा समावेश करा. ती समिती सर्व चौकशीवर लक्ष ठेवेल, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

दादा एनडीएतून बाहेर पडतील किंवा आम्ही एनडीएत जाऊ ही भीती कुणाला होती?  

अजितदादांच्या अपघातामागे काही राजकीय कारण आहे का, याबाबतही रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले की, दादांसोबत आमची विलीनीकरणाबाबत काय चर्चा झाली होती ते आम्हालाच माहीत आहे. आम्ही एनडीएसोबत सत्तेत जाणार ही गोष्ट काहींना आवडत नसावी. दुसरे म्हणजे दादाच एनडीएतून बाहेर पडतील आणि रस्त्यावर येऊन आमच्यासोबत सामान्यांसाठी लढाई लढतील असे होते. दादा एनडीएतून बाहेर पडतील किंवा आम्ही एनडीएत जाऊ ही भीती नेमकी कुणाला होती? याचा शोध घ्यावा लागेल, असे रोहित पवार म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सर्व नियोजन दादांनी केले होते आणि मार्गदर्शक कागदांचे वितरण दुसरा एक नेता करायचा. नगर परिषदा व नगर पंचायत निवडणुकीत 200 पट ताकद लावायची असे ठरले होते, परंतु दुर्दैवाने दादांचा अपघात झाला आणि दादा नसल्याने इतर नेत्यांनी दीडशे पट कमी ताकद लावली. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार कमकुवत व एकटे पडले. ती ताकद का कमी लावली व कुणी लावली याच्या खोलात जावे लागेल, असे म्हणत रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

रोहित पवार यांनी उपस्थित केलेले मुद्दे

z विमान 50 कोटींचे होते, पण इंजिनचा दर्जा पाहता 10 कोटीलाच विकले गेले असते. विमानाचा विमा 55 कोटी रुपयांचा होता आणि विमानातून प्रवास करणाऱ्यांसहित विम्याची रक्कम 210 कोटी रुपये होते. त्या 210 कोटींपैकी किती पैसे मुख्य पायलटला मिळणार होते?

z या दुर्घटनेला जबाबदार असणारा व्हीएसआरचा अकाऊंटेबल मॅनेजर कुठे आहे, त्याचा इंटरह्यू कुणी घेतला?

z कार चालवणाऱ्याला ट्रकचे लायसन्स मिळत नाही. मग सुमित कपूर आणि रोहित सिंग लेगसी आणि लेअरजेट अशी दोन्ही प्रकारची विमाने कसे चालवत होते?

z पायलटची मद्यपान चाचणी करताना इतर कंपन्यांमध्ये व्हिडीओ बनवले जातात तसे व्हीएसआरच्या पायलटचे व्हिडीओ जारी करा.

z लेअरजेट विमान 5 हजार तास वापरले जाते. दादांच्या विमानाचे 4915 तास झाले होते. फक्त 85 तास बाकी होते. दादांनी झेड सुरक्षा असताना इतकी हलगर्जी का?

z अमेरिकन बनावटीच्या लेअरजेट विमानाची हिंदुस्थानात नोंदणी होत नाही. तरीसुद्धा व्हीएसआरच्या विमानाची डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी बेकायदा नोंदणी केली.

z विमानाच्या सीव्हीआरमध्ये किमान 2 तासांची रेकार्ंडग व्हायला हवी असा डीजीसीआयचा नियम आहे. मग फक्त 30 मिनिटांची सीव्हीआर रेकार्ंडग क्षमता असलेल्या लेअरजेटची नोंदणी झालीच कशी?

व्हीएसआर कंपनीत गोपी नावाची व्यक्ती फ्लाईट प्लॅन बनवते. त्या कागदपत्रांमध्ये हेराफेरी करण्याचे प्रयत्न आता सुरू आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांनी ई-मेल, मेसेजेस अशा डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी करावी.