
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱया नागपूरच्या शिवद्रोही प्रशांत कोरटकर याच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन एक वर्ष झाले तरी अजूनही या गुह्याचा तपास का पूर्ण झालेला नाही? असा प्रश्न विचारणारी कायदेशीर नोटीस इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी ऍड. असीम सरोदे, ऍड. श्रीया आवले, ऍड. योगेश सावंत, ऍड. हेमा काटकर आणि ऍड. सकलेन मुजावर यांच्यामार्फत कोल्हापूर पोलिसांना पाठविली आहे.
सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करणे, धमकी देणे, मुख्यमंत्री ब्राह्मण आहे – आमचा आहे, अशी तंबी भरणे आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणे, याबाबत समाजमाध्यमांसह शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे पोलिसांना कोरटकर विरोधात तक्रार दाखल करणे भाग पडले. अखेर 1 मार्च 2025 रोजी शिवद्रोही कोरटकरविरोधात इंद्रजित सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला. प्रशांत कोरटकर आणि त्याला वाचविण्यासाठी सरकारमधील एक लॉबी व कट्टरवादी विचारधारा असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली होती; पण एक वर्ष होत आले तरी अजूनही या गुह्याचा तपास पूर्ण होऊन चार्जशीट दाखल झाली की नाही, याबाबत स्पष्टता नसल्याने पोलिसांना कायदेशीर नोटीस पाठवून विचारणा केल्याचे इंद्रजित सावंत म्हणाले.





























































