
पहाटे गारठा आणि दुपारनंतर झपाट्याने वाढणारे तापमान याचा मोठा फटका सध्या रायगडातील मासेमारीला बसला आहे. हवामान बदलामुळे फिश फाईंडर यंत्रणाही ठप्प झाली असून म्हाक्ऱ्याने चकवा दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाळे टाकले तरी त्यात म्हावरं येत नसल्याने बाजारपेठेत दर कडाडले आहेत. त्यामुळे खवय्यांच्या खिशालाही चाट बसली असून मासळी न मिळाल्याने मच्छीमारांना हात हलवत परतावे लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल जाणवू लागला. मासे शोधण्यासाठी फिश फाईंडर किंवा इको साऊंडरसारखी सोलार तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे अपेक्षेप्रमाणे काम करीत नसल्याचे मच्छीमारांना आढळून आले आहे. तापमानातील बदलामुळे समुद्रातील मासे सतत आपले स्थान बदलत असल्याने त्याची रडारवर अचूक नोंद मिळत नाही. त्याचा परिणाम थेट मासेमारीवर होतो. त्यामुळे मासळीचे दर सध्या तिप्पट वाढले आहेत. सुरमई, पापलेट, कोळंबी यासारखी प्रसिद्ध मासळी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.
- काही दिवसांपूर्वी चार पापलेट साधारण ४०० रुपयांना मिळत होते. मात्र त्याच आकाराचे पापलेट सध्या १ हजार २०० रुपयांपर्यंत विकले जात आहेत.कोळंबी, मांदेली, बांगडा यासह इतर मासळींच्या दरात दीड ते दुप्पट वाढ झाली आहे.
सकाळी तापमान २३ अंश सेल्सिअसपर्यंत असते, तर दुपारनंतर ते ३० अंशांपर्यंत वाढते. यामुळे समुद्रातील मासे आपली ठिकाणे बदलतात. अद्ययावत रडार यंत्रणेवर आधारित फिश फाईंडर यंत्रालाही माशांची ठिकाणे शोधणे अवघड होते.
पौर्णिमेनंतर दशमीपर्यंत भांगाची भरती असल्याने मासेमारीवरही परिणाम होत आहे. मात्र परिस्थिती बदलल्यानंतर मासळी उपलब्ध होण्याची शक्यता नागाव येथील मच्छीमार साईनाथ पावसे यांनी व्यक्त केली.
जवळा, कोळंबी, माकुल
ताज्या मासळीला मोठी मागणी असल्याने बंदरात आलेली मासळी लिलावात हातोहात विकली जात आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत मासळी शिल्लक राहत नसल्याचे मासळी विक्रेत्या संगीता पेरेकर यांनी सांगितले. सध्याच्या हंगामात जवळा, कोळंबी, माकुल अशी मासळी मिळते. या मासळीला लिलावात जास्त मागणी नसल्याने ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते, तर पापलेट, सुरमई यासारखे मासे स्थानिक बाजारात विक्रीसाठी शिल्लकच राहत नसल्याचे सांगण्यात आले.





























































