
पेण तालुक्यातील खारेपाट विभागाची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झाली आहे. आधीच पाणीटंचाईचे चटके बसत असताना प्रशासनाने आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होईल अशी नोटीस जाहीर केली. त्यामुळे स्थानिकांच्या संतापाचा स्फोट झाला आणि संतप्त गावकऱ्यांनी रिकामे हंडे घेऊन प्रांताधिकारी कार्यालयावर ‘धोंडबा’ आंदोलन केले. तसेच अधिकाऱ्यांना जाब विचारला. ‘धोंडबा’ ग्रामदेवतेची वेशभूषा करून गावकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
तालुक्यातील वाशी, वढाव, भाल, विठ्ठलवाडी, काळेश्री, कान्होबा, कणे, बोझें, दिव, जनवली, नारवेल, मंत्रीवाडी, घोडाबंदर, बेनवले, मदस, बोरी, शिर्की, बहीरामकोटो आदी गावांतील गावकरी मोलमजुरी आणि शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. सुमारे ५० हजार हजार लोकवस्ती असलेल्या या गावामध्ये आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा पाणी येत होते. मात्र वर्षानुवर्ष पाणीटंचाई भेडसावत असताना खारेपाटला आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी नोटीस जलजीवन प्राधिकरणाने जाहीर केल्याने गावकऱ्यांच्या संतापाचा भडका उडाला. संतप्त ग्रामस्थांनी प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला आणि धोंडबा आंदोलन केले. प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत महिलांनी परिसर दणाणून सोडला.
अधिकाऱ्यांना विचारला जाब
ग्रामस्थ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. या आंदोलनानंतर प्रशासनाची तंतरली आणि आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्याची नोटीस रद्द करून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न केले जातील असे लेखी आश्वासन दिले. हेटवणे धरणाचे पाणी मुंबईला, नवी मुंबईला नेण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना दुसरीकडे मात्र खारेपाटमधील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. शासनाच्या या दुटप्पी भूमिकेचा जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांनी निषेध केला आहे. खारेपाटातील ग्रामस्थांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळण्याकरिता शिवसेनेने विधानसभेत सद्भा आवाज उठवला आहे.





























































