गडचिरोलीतील नक्षल्यांची 44 स्मारके उद्ध्वस्त; पोलीस, सीआरपीएफची धाडसी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांची 44 स्मारके एकाच दिवसात नष्ट करण्यात सुरक्षा यंत्रणांनी यश मिळवले. पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकांनी ही धाडसी कारवाई केली. नक्षलवाद्यांनी नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी संबंधित स्मारके उभारली होती. त्यामुळे ती नक्षलवाद्यांची दहशतीचे प्रतीक मानली जात होती. सुरक्षा पथकांनी स्मारके उद्ध्वस्त करून थेट नक्षल्यांच्या मुळावर घाव घातला.

नक्षलवाद्यांच्या स्मारकांविरोधात कारवाईसाठी सुरक्षा जवानांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकासह सीआरपीएफ आणि जिल्हा पोलीस दलाच्या 18 पथकांतील जवळपास 800 जवान मोहिमेत सहभागी झाले होते. मोहिमेच्या योग्य नियोजनामुळे 44 माओवादी स्मारके उद्ध्वस्त करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. एकाच दिवसात ही स्मारके नष्ट करण्यात आली. गडचिरोलीतील माओवाद्यांच्या दहशतीचे शिल्लक उरलेले शेवटचे प्रतीकही नष्ट झाल्यामुळे नक्षल्यांना जबरदस्त झटका बसला आहे. नक्षलवाद्यांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूनेच अतिदुर्गम भागांमध्ये माओवादी स्मारकांची निर्मिती केल्याचे उघडकीस आले आहे. सुरक्षा यंत्रणांच्या धाडसी कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमधील भीतीचे वातावरण कमी होऊन सुरक्षिततेची भावना वाढली आहे.