किन्हवलीचा आठवडी बाजार बेदखल कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार, सुविधांच्या नावाने बोंब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्यामकांत पतंगराव 

शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भोंगळ कारभारामुळे किन्हवली आठवडा बाजारातील छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना उघड्यावरच दुकाने थाटावी लागत आहेत. एकीकडे ही बाजार समिती न चुकता बाजार कर वसुली जोरात करत असतानाच दुकानदारांना मात्र सुविधा पुरवल्या जात नसल्याने त्यांना नाशवंत माल प्लॅस्टिकच्या ताडपत्रीतच झाकून ठेवावा लागत आहे. व्यापारी संकुल उभारण्यासाठी कानाडोळा केल्याने या संकुलासाठी निघालेल्या निविदाच रद्द करण्याची नामुष्की बाजार समितीवर आली. मात्र त्यातूनही धडा न घेतलेल्या बाजार समितीमुळे किन्हवलीचा आठवडी बाजार बेदखल झाला आहे.

शहापूर तालुक्यातील मिनी तालुक्याचे ठिकाण म्हणून किन्हवली शहर ओळखले जाते. 40 ते 50 गावखेड्यांची ही मुख्य बाजारपेठ आहे. येथे शाळा, महाविद्यालये, पोलीस स्टेशन, बस स्थानक, टपाल कार्यालय, दूरध्वनी केंद्र, बँका,पतपेढ्या, शासकीय आरोग्य केंद्र, खासगी दवाखाने, श्री समर्थ बैठकीसारखी आध्यात्मिक केंद्रे, विविध प्रकारच्या शासकीय, निमशासकीय, मंडळे, महामंडळे, बचत गटांची व विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्थांची कार्यालये आहेत.

बाजार समितीने कागदपत्रांची पूर्तता न केल्याचा फटका

चार वर्षांपूर्वी व्यापारी संकुल उभारण्यासाठी बांधलेल्या पक्क्या दगडी बांधकामावर गाळे बांधण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्या निविदा रद्द झाल्या आणि गाळ्यांचे बांधकाम रखडले. अनेकांनी गाळे घेण्यासाठी भरलेल्या रक्कमासुद्धा माघारी घेतल्या. त्यामुळे छोट्या मोठ्या दुकानदारांना आता उघड्यावर बसूनच त्यांचा माल विक्री करावा लागतो. आठवडी बाजारात न चुकता दुकानदारांकडून बाजार कर वसुली करणाऱ्या बाजार समितीकडून मात्र दुकानदारांना कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे भाजीपाला व जिन्नस खराब होऊ नयेत म्हणून या दुकानदारांना प्लॅस्टिकच्या ताडपत्रीचे छप्पर करून त्यांचा माल झाकावा लागतो.

बाजार समितीच्या उपबाजार आवारातील सातबारा उताऱ्यावर काही खासगी नावे लागली असून अनेक तांत्रिक अडचणी असल्याने गाळे बांधण्यात अडचणी येत आहेत, यावर लवकरच तोडगा निघेल’.
नंदलाल डोहळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहापूर