
सत्तेसाठी अनेक पक्ष फोडणाऱ्या भाजपला भिवंडीत मात्र स्वपक्षीय नगरसेवकांनीच दणका दिला आहे. भाजप नगरसेवक नारायण चौधरी यांच्यासह ९ नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला असून काँग्रेसच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘सेक्युलर फ्रंट ‘मध्ये हा गट सहभागी झाला आहे. त्यामुळे उद्या शुक्रवारी होणाऱ्या महापौर, उपमहापौर निवडणुकीचे बहुमताचे गणित ‘सेक्युलर फ्रंट’ने जमवले असून कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेपासून रोखण्याची रणनीती आखली आहे. एकूणच भिवंडी महापालिकेवर काँग्रेसप्रणीत ‘सेक्युलर फ्रंट’ची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपने महापौरपदाची उमेदवारी देऊनही ऐनवेळी नारायण चौधरी यांचा पत्ता कापला. त्यामुळे चौधरी यांच्यासह ९ नगरसेवकांनी भाजपपासून फारकत घेऊन वेगळा गट तयार केला आहे. या गटात ९ नगरसेवक असल्याचे समजते. या गटाने काँग्रेसप्रणीत भिवंडी सेक्युलर फ्रंटला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपला धक्का बसला आहे.
शुक्रवारी होणाऱ्या महापौर निवडणुकीसाठी सेक्युलर फ्रंटचे नारायण चौधरी, कोणार्क आघाडीचे विलास पाटील आणि भाजपच्या स्नेहा पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी आणि भाजपचा फुटीर गट यांच्या सेक्युलर फ्रंटचे संख्याबळ ५० च्या पुढे जात असल्यामुळे भाजपला सत्तेपासून रोखण्याची काँग्रेसची खेळी यशस्वी होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सत्ता स्थापनेसाठी ४६ नगरसेवक
भिवंडी महापालिका निवडणुकीत ९० पैकी काँग्रेसने सर्वाधिक ३० जागा जिंकल्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने १२, भाजपने २२, शिंदे गटाने १२, समाजवादी पार्टीने ६, कोणार्क विकास आघाडीने ४, भिवंडी विकास आघाडीने ३ जागा जिंकल्या. अपक्ष एका ठिकाणी निवडून आला आहे. सत्ता स्थापनेसाठी ४६ चा आकडा एकाही पक्षाला गाठता आला नाही.
काँग्रेस भाजप – शिंदे गटासोबत जाणार नाही
सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस विचारधारेशी तडजोड करणार नाही, असे ठामपणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. आम्ही भाजप, शिंदे गटासोबत जाणार नाही. आम्ही त्यांचा पाठिंबा घेणार नाही आणि त्यांना पाठिंबा देणारही नाही. भाजप सोडून त्यांच्या विचारधारेचा त्याग करून नारायण चौधरी यांच्यासह काही नगरसेवक काँग्रेसप्रणीत सेक्युलर फ्रंटमध्ये आले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे स्वागत करतो असेही सपकाळ यांनी सांगितले. तर भाजप सोडून काही नगरसेवक आघाडीत सहभागी झाल्याने भिवंडी पालिकेत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचे राष्ट्रवादीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे म्हणाले.






























































