
ब्रिटीश उच्चायुक्तालयात आयोजित एका संयुक्त सत्रासाठी ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांना पोहोचायला उशीर झाला. यावेळी दिल्लीतील वाहतूक कोंडीवर भाष्य करताना त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) अनेक समस्या सोडवू शकते, पण दिल्लीची वाहतूक कोंडी सोडवणे अजूनही त्याच्या आवाक्याबाहेर आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाने सभागृहात एकच हशा पिकला.
ऋषी सुनक आणि ब्रिटनचे उपमुख्यमंत्री डेव्हिड लॅमी या सत्रासाठी उपस्थित राहणार होते. यावेळी ऋषी सुनक उशिरा पोहोचले. त्याबाबत माफी मागत ते म्हणाले, आम्हाला काही मिनिटे उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगीर आहे. या आठवड्यात आपण ऐकल्याप्रमाणे एआय अनेक गोष्टी करू शकते, पण ते अजून दिल्लीची ट्रॅफिक सुधारू शकलेले नाही. त्यामुळे अजून बरेच काम बाकी आहे.
#WATCH | Delhi: Former UK PM Rishi Sunak says, “…AI can do many things as we’ve heard this week, but it can’t yet fix Delhi’s traffic…”
“…But what this week has been is just a showcase of the extraordinary, not just the leadership of Prime Minister Modi, but the energy… pic.twitter.com/1R0zdfXs4F
— ANI (@ANI) February 19, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एआय क्षेत्रातील दूरदृष्टीचे कौतुक करतानाच सुनक यांनी हिंदुस्थानने या बाबतीत ब्रिटनला मागे टाकल्याचे मान्य केले. मात्र, क्रिकेटचा संदर्भ देत त्यांनी एक मजेशीर टोलाही लगावला. हिंदुस्थानने एआयमध्ये ब्रिटनला मागे टाकणे थोडे निराशाजनक आहे. पण मी नुकतेच पंतप्रधान मोदींना आठवण करून दिली की, आयसीसी कसोटी क्रमवारीत इंग्लंड अजूनही हिंदुस्थानच्या पुढे आहे, जे कदाचित अधिक महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

























































