AI शिका नाहीतर, प्रमोशन आणि पगारवाढ विसरा; 11 हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीनंतर Accenture चा इशारा 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजच्या धावपळीच्या युगात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) केवळ एक शब्द न राहता कामाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर झपाट्याने वाढत आहे. आता तुम्हाला नोकरीत वाढीव पोस्ट, पगारवाढ हवी असेल तर, एआयचा वापर करणे बंधनकारक असल्याचे अनेक बड्या कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये अ‍ॅसेंचर या कंपनीचाही समावेश आहे. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ही नवीन अट लागू केली असून, यामुळे कॉर्पोरेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

‘प्रमोशन’साठी अ‍ॅसेंचर कंपनीने नवा नियम आणला असून आपल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना आणि असोसिएट डायरेक्टर्सना यासंदर्भात एक ईमेल केला आहे. वरिष्ठ पदावर जाण्यासाठी आता ‘AI’ चा नियमित वापर करणे आवश्यक आहे. केवळ काम करणे पुरेसे नाही तर, ते काम करण्यासाठी तुम्ही किती प्रभावीपणे एआय टूल्स वापरता, यावर तुमचे प्रमोशन अवलंबून असणार आहे. भविष्यात कंपन्यांमध्ये टिकून राहण्यासाठी आपल्या कार्यपद्धती बदल करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांनी स्वतःला ‘रीस्किल’ करणे आवश्यक आहे, असे कंपनीच्या CEO ज्युली स्वीट यांनी सांगितले आहे.

गेल्या काही वर्षात अ‍ॅसेंचर कंपनीने जवळपास 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. त्यामुळे आता नोकरी टिकवण्यासाठी कर्मचाऱ्यांना AI चा वापर करावा लागणार आहे. एआयमुळे उत्पादकता वाढेल आणि कमी मनुष्यबळात जास्त काम करता येतील. यामुळेच आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात होत असताना, ज्या कर्मचाऱ्यांना एआयचा उत्तम आणि योग्य वापर करता येतो त्यांनाच प्राधान्य दिले जात आहे. भविष्यातील नोकरी वाचवण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी आता प्रत्येक आयटी प्रोफेशनलला एआयचा वापर करावाच लागणार आहे.

दरम्यान, आता कंपनीची उत्पादकता पाहता कर्मचारी खरोखर एआय वापरत आहेत की नाही हे तपासण्यासाठी अ‍ॅसेंचरने खास यंत्रणा सज्ज केली आहे. कंपनी ‘एआय रिफायनरी’ (AI Refinery) सारख्या इन-हाउस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या लॉग-इन्सवर लक्ष ठेवणार आहे. हे प्लॅटफॉर्म एनव्हीडियाच्या (NVIDIA) सहकार्याने तयार करण्यात आले असून, याद्वारे कोण किती वेळा आणि कसे एआय वापरते, याची संपूर्ण माहिती कंपनीकडे जमा होईल.

केवळ अ‍ॅसेंचरच नाही तर, मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि गुगल यांसारख्या कंपन्यांनीही एआय वापराबाबत कडक पावले उचलली आहेत. मायक्रोसॉफ्टने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. जर त्यांचा एआयवर विश्वास नसेल तर त्यांनी कंपनी सोडण्याचा विचार करावा, असा इशारा कंपनीचे CEO सत्या नडेला यांनी दिला आहे.