
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (ईव्हीएम) हॅक केल्या होत्या असा आरोप खुद्द सत्ताधारी पक्षाच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी केला होता. त्यावरून भाजपने त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. शेळके यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपवाल्यांनी हिंमत असेल तर आपल्याविरुद्ध दावा ठोकावा, त्यानंतर मी कोर्टात पुरावे सादर करेल, असे आव्हानच शेळके यांनी दिले आहे.
सुनील शेळके यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना स्थानिक भाजप नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजपवाल्यांना खरोखरच अब्रू असेल तर त्यांनी माझ्यावर आठ दिवसांत अब्रुनुकसानीचा दावा ठोकावा. त्यानंतर कोर्टाकडून मला समन्स येईल तेव्हा मी पुरावे कोर्टात सादर करेन. तत्पूर्वी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मी लेखी स्वरूपात तक्रार देणार आणि विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनाही पुरावे देणार आहे.
भाजपच्या पराभूत उमेदवारांनीच माहिती दिली
भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत जे उमेदवार उभे केले होते त्यातील काही उमेदवारांकडून 25 लाख तर काहींकडून 35 लाख रुपये घेतल्याची माहिती आहे असे वक्तव्य आपण केले होते. निवडणुकीत भाजपचे जे उमेदवार पराभूत झाले त्यांच्या नातेवाईकांनी आणि सहकाऱयांनीच ती माहिती आपल्याला पुराव्यानिशी दिली होती, कुणी भविष्यवेत्त्याने वा हॅकरने दिली नव्हती, असे शेळके म्हणाले. कुणाच्या खात्यावर किती तारखेला पैसे दिले आणि कोण लोक ईव्हीएम हॅक करतात त्यांची माहिती त्यांनी दिली, असा दावाही शेळके यांनी केला.
ईव्हीएम हॅकर पुणे जिल्ह्यात
ईव्हीएम हॅकर पुण्यातील मावळ आणि खेड तालुक्यात आहेत. मावळमधील काही स्वयंघोषित नेते रॅकेटवाल्या टोळीला भेटले. निवडून आला नाहीत तर पैसे परत देऊ अशी डील त्यांच्यात झाली. आपल्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करतो म्हणणारेच त्यामध्ये आहेत, असे आमदार शेळके म्हणाले.





























































