
>> श्रीकांत आंब्रे
गावात सुसज्ज दवाखाना असलेला एक डॉक्टर गावातील रुग्णांना आणि गावकऱयांना इतका जीव लावतो की रुग्ण व गावकरी त्याच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून जातात. हे भाग्य सर्वच डॉक्टरांच्या नशिबात नसतं. पण तळकोकणातील एक डॉक्टर याला अपवाद आहेत. गेली तीस वर्षे आपल्या डॉक्टरकीच्या व्यवसायातून त्या गावाशी ते इतके एकरूप झाले आहेत की ते मूळचे कोल्हापूरच्या रांगड्या मातीतील आहेत हे खरंच वाटत नाही. कोल्हापूरपासून गगनबावड्याच्या घाटाने खाली उतरलं की लगेच लागतं ते तळेरे हे छोटंसं गाव. तीस वर्षांपूर्वी कोल्हापुरातील एक तरुण डॉक्टर जोडपं शिक्षण संपवून प्रॅक्टीससाठी गाव शोधत इथे येऊन पोहोचलं. हे निवांत गाव त्यांना आवडलं आणि तिथेच मुक्काम ठोकायचा त्यांनी ठरवलं, तेही कसलाही हिशोब न मांडता आणि भविष्याचे कोणतेही आडाखे न बांधता. घाटावर वाढलेल्या या दोघांनाही कोकणातील नको इतकी स्पष्टवक्ती व इरसाल माणसं भेटू लागली आणि एका धमाल नात्याची सुरुवात झाली. या माणसांचे धमाल किस्से आणि खुमासदार अनुभव यांची गुंफण असलेलं ‘मी कोकणचो डॉक्टर’ हे पुस्तक जन्मास आलं. पुस्तकातील रंजक अनुभव आहेत त्या पुस्तकाचे लेखक डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचे.
अत्यंत स्वाभिमानी, आपलं तेच खरं म्हणणारा, गजालीत रमणारा, गप्पा मारताना समोरच्याला मस्त चिमटे काढणारा, चलाख, बेरका आणि बुद्धिमान असलेला हा कोकणी माणूस, त्यांना मनापासून भावला. त्यांच्यावर उपचार करताना त्याची स्वभाववैशिष्ट्य समजली आणि त्याच्या कलाने घेत त्याच्याशी कसं वागावं याची समजही आली. मनात काहीही न ठेवता ताडफाड बोलणाऱया या कोकणी माणसात त्यांचा जीव गुंतत गेला तो माणुसकीच्या भावनेने. त्यांची सुखदुःख, पैशाची चणचण, उत्सवात, ग्रामसंस्कृतीत रमणारा त्याचा स्वभाव पाहताना रुग्णापेक्षा त्याच्या माणूसपणाचा शोध घेत त्यांच्यात ते रमू लागले. मालवणी भाषाही सफाईदारपणे बोलू लागले. कोकणी पेशंट आणि त्याच्या भ्रामक समजुती, त्याच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, अनेकदा डॉक्टरांचीच उलटतपासणी घेण्याची सवय, घरी व्हिजीट देताना येणारे काही सुखदायक तर काही दुःखदायक अनुभव, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधांचे डोस न घेता ते आपल्या मनाप्रमाणे घेणारे पेशंट, रात्री-अपरात्री घरी येणाऱया सिरियस पेशंटमुळे उडणारी तारांबळ, दवाखान्यातील सिस्टर म्हणजे दवाईसुंदरीच्या चलाख स्वभावामुळे आणि तत्परतेमुळे पेशंटना मिळणारा दिलासा, पेशंटला सलाईन चढवताना आलेले मजेशीर आणि तापदायक अनुभव, उत्साह घेऊन येणारा मुंबईचा चाकरमानी, मध्यरात्री रिक्षातून येणारी डिलिव्हरीची पेशंट, आपल्या वैद्यकीय व्यवसायाची संबंधित किस्से डॉक्टर सांगतात तेव्हा त्यातील विनोदाची झलक ऐकून ओठावर हसू फुटल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टरांची पत्नी डॉ. ऋचा यांचाही डॉक्टरांच्या यशात मोलाचा सहभाग असल्याचं लक्षात येतं. त्यांच्या वैद्यकीय कौशल्याचे नमुनेही डॉक्टरांनी सांगितले आहेत.
रुग्णाच्या शारीरिक तपासणीपेक्षा त्याच्याशी मारलेल्या गप्पांतून त्याची मानसिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, कौटुंबिक, राजकीय पातळीही समजते हे डॉक्टरांचं निदान आहे. यातील काही तऱहेवाईक पेशंटची डॉक्टरांशी होणारी डायलॉग जुगलबंदी ऐकण्यासारखी असते. ‘आपला ताच खरा’ हे सांगताना अशा पेशंटसमोर डॉक्टरांना सपशेल माघार कशी घ्यावी लागती याचे किस्सेही मजेशीर आहेत. डॉक्टरांची उत्तम विनोदबुद्धी, विनोदाची जाण आणि माणसांच्या स्वभावातील विसंगती अचूक टिपण्याचं भान लेखतून जाणवतं. रुग्णांच्या स्वभावावर ते टिकाटिप्पणी करत असले तरी त्यात उगाच कुणाची रेवडी उडवण्याचा किंवा थिल्लरपणा करण्याचा हेतू नसतो हे लक्षात येतं. व्यक्तीनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ विनोदातून त्यांचे हे किस्से फुलतात. त्यात सहजता आहे आणि सराईत विनोदी लेखकाचे सगळे गुण आहेत. त्यामुळे एक उत्तम धमाल पुस्तक वाचल्याचं समाधान रसिक वाचकांना नक्कीच मिळेल.
स्वप्नदीप क्रिएटिव्हजचे मुखपृष्ठ आणि आतील मांडणी सुरेख आणि आकर्षक आहे. दीपक संकपाळ यांची आतील चित्रेही प्रसंगांना साजेशी आहेत.
मी कोकणचो डॉक्टर
लेखक ः डॉ. मिलिंद कुलकर्णी
प्रकाशक ः समकालीन प्रकाशन, पुणे
पृष्ठे ः 120, n मूल्य ः रु. 200/-




























































