
>> प्रांजल वाघ, [email protected]
बेळगाव शहराच्या आग्नेयेस मलप्रभा नदीवर ‘नाविलुतीर्थ’ नावाचे धरण 1972 मध्ये बांधले गेले आणि रेणुकासागर नावाचा जलाशय जन्मास आला. याच ठिकाणी सरोवराला बिलगून वसले आहे एक छोटेखानी शहर, पण हे शहर फार प्राचीन आहे. साधारण इ.स. नवव्या शतकात राष्ट्रकुटांचे मंडलिक असलेले ‘रट्ट’ राजे यांनी याच ठिकाणी ‘सुगंधावर्ती’ नावाचं शहर वसवलं. ‘सौगंधीपुरा’ असेही त्याचे दुसरे नाव. याच सुगंधावर्तीचा अपभ्रंश झाला आणि आजचं ‘सौंदत्ती’ अथवा ‘सवदत्ती’ जन्माला आलं.
नवव्या ते 19 व्या शतकापर्यंत सौंदत्ती शहराला अनेक राज्यकर्त्यांचा अंमल अनुभवता आला. रट्ट, देवगिरीचे यादव, विजयनगर, आदिलशहा इतके विविध राजांच्या अमलाखाली हा प्रदेश 17व्या शतकापर्यंत होता. शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान हा प्रदेश स्वराज्याला जोडला. जवळच असलेला परसगड डागडुजी करून भक्कम केला आणि या प्रदेशावर मराठ्यांची सत्ता बसली. साधारण 1734 साली नवलगुंड-शिरसंगी येथील दुसऱ्या जयाप्पा देसाई या नायकाने सौंदत्ती शहरात एक कोट उभारला. हाच सौंदत्ती किल्ला.
तिहेरी तटबंदी असलेला हा भुईकोट एका छोट्या उंचवट्यावर बांधून काढलेला आहे. किल्ल्याबाहेर पूर्वी खंदक होता आणि खंदकालगत असलेली तटबंदी आज भग्नावस्थेत आहे, पण उरलेला किल्ला उत्तम स्थितीत आहे – जणू आजही तिथं एखाद्या राजाचं राज्य सुरू आहे! दुर्ग कसा वाचवायचा आणि हा अनमोल ऐतिहासिक वारसा कसा जतन करायचा याचं सौंदती दुर्ग हे एक उत्तम उदाहरण!
अष्टकोनी आकाराच्या असलेल्या या दुर्गाला आठ उत्तुंग बुरूज आहेत. दुर्गाला एक मुख्य द्वार असून त्यासमोर तटबंदी बांधून ते सुरक्षित करून घेतले आहे. किल्ल्याच्या आत एक पाण्याची टाकी आहे. हाच किल्ल्याचा मुख्य पाणीसाठा. आतील परिसर अत्यंत स्वच्छ ठेवलेला असतो आणि इथे अनेक ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्यायोग्य उद्यानं बनवलेली आहेत. अनेक ठिकाणी पडून गेलेल्या महालांची, घरट्यांची जोती आज ही टिकून आहेत.
दुर्गाच्या मध्यभागी दोन बुरुजांनी संरक्षित असा एक चौकोनी परकोट बांधला आहे. या परकोटाच्या आत आहे जयाप्पा देसाई यांनी बांधलेले ‘श्री काडसिद्धेश्वर महादेव मंदिर’! मंदिराच्या सभोवताली असलेल्या देवड्यांच्या छज्जावर दोनशेहून अधिक वेगवेगळ्या पद्धतीची कलाकुसर आहे. बालेकिल्ल्याच्या तटावर चढून सभोवतालच्या संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येते. दूर पूर्वेकडे छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात आणलेला परसगड यल्लम्माच्या डोंगरावर दिमाखात उभा असलेला दिसतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येनंतर सौंदत्ती मुघलांकडे आला, पण मराठ्यांनी पुन्हा आपले वर्चस्व इथे प्रस्थापित केले. पुढे 1770च्या आसपास हैदर अलीने आपली क्रूर सत्ता इथे लादली, पण 1792 मध्ये मराठ्यांनी त्याचा श्रीरंगपट्टणला दणकून पराभव केल्यावर तहात हा प्रदेश आणि सौंदत्तीचा दुर्ग मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला. रामदुर्गचे पटवर्धन यांनी आपला अंमल इथे बसवला.
17व्या आणि 18व्या शतकात छत्रपती शिवरायांच्या मराठ्यांनी अखंड हिंदुस्थान आपल्या पराक्रमाने गाजवून सोडला. त्याच पराक्रमाची प्रचीती घ्यायची असेल तर सौंदत्तीला नक्की
भेट द्या!
























































