
>> डॉ. समिरा गुजर–जोशी ([email protected])
केवळ शब्दातून दृश्यभास व्हावा अशी चमत्कृती निर्माण करणे हे महाकाव्यांचे वैशिष्टय़. एका छोटय़ाशा कथेवर आधारीत शिशुपाल वध हे महाकाव्य 20 सर्गांमधून 1800 श्लोक इतकं विस्तृत रचलं आहे. एखाद्या छोटय़ा कथानकाचा असा रंजक विस्तार करणे हे लेखकाचे कौशल्यच म्हणावे लागेल. कवी माघाच्या रसिकदृष्टीचा प्रत्यय देणाऱ्या या रचनेचा परिचय.
मागच्या लेखात आपण माघाविषयी जी दंतकथा प्रसिद्ध आहे ती पाहिली. त्याची विद्वत्ता, त्याचे ऐश्वर्य कमावणे आणि गमावणे याविषयीची ती दंतकथा आपल्याला कवी माघाचे एक धूसर चित्र दाखवते. पण त्याहून अधिक त्याला समजून घ्यायचे असेल तर त्याच्या काव्यातूनच माघाचा शोध घ्यायला हवा. या लेखातून शिशुपाल वध या महाकाव्याचा परिचय करून घेऊया.
सगळ्यात आधी या काव्याचा विषय काय ते पाहू. या महाकाव्याच्या शीर्षकात स्पष्ट म्हटल्याप्रमाणे शिशुपालाचा वध हा या काव्याचा विषय आहे. शिशुपाल हा चंदी देशाचा राजा दृष्ट, जुलमी आणि प्रजेला त्रास देणारा होता. नात्याने तो कृष्णाचा आतेभाऊ होता. त्याने पांडवांच्या राजसूय यज्ञात कृष्णाची निंदा करत युद्धाचे आव्हान दिले तेव्हा शिशुपालाचे शंभर अपराध भरले हे जाणून श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने त्याला ठार मारले. कथा म्हणावी तर ही एवढीच. पण माघाने त्यावर 20 सर्गांचे सुमारे 1800 श्लोकांचे विस्तृत महाकाव्य लिहिले आहे. एखाद्या छोटय़ा कथानकाचा असा रंजक विस्तार करणे हे लेखकाचे कौशल्यच म्हणावे लागेल.
आज हे आश्चर्यकारक वाटू शकतं की इतके विस्तृत का लिहावेसे वाटत असे! दुर्गाबाई भागवत यांनी कादंबरीच्या प्रस्तावनेत जे सांगितले आहे ते मला इथे आठवते की, त्या काळी या महाकाव्यांचे सामूहिक पठण होत असणार. याचा श्रोता हा दरबारातील विद्वानांचा वर्ग असणार. त्यामुळे थक्क करणारी वर्णने, राजनीतीच्या चर्चा, त्यांची बौद्धिक दाद मिळविणाऱया चमत्कृतीपूर्ण रचना यातून महाकाव्याची शैली घडत गेली. कालिदासाच्या काव्यात जो सहजपणा आहे तो यापुढील महाकाव्यात नाही. भावनांचा उत्कट आविष्कारही फारसा नाही. त्यांच्यातही गुंग करण्याचे सामर्थ्य आहे; पण ते वेगळ्या प्रतीचे आहे.
आज व्हिडिओ गेम्सचा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहेच की. तासन् तास हे गेम्स लोक कसे खेळतात या प्रश्नाला जसे उत्तर नाही तसेच महाकाव्यातील या विस्ताराचे, पंडित्यपूर्ण मांडणीचे लोकांना काय आकर्षण होते हे सांगणे अवघड आहे. आजही आपण हे वाचताना थक्क होतो यात शंका नाही. आज आपल्याला दृश्य माध्यमे अत्यंत प्रभावी झालेली दिसतात. सध्या तर ‘एआय’ला सांगून वाटेल ते दृश्य आपण साकार करू शकतो. सोशल मीडियावर याचे रोज वेगळे प्रयोग होताना आपण पाहतो. कधी लहान मुलं मोठय़ांसारख्या हालचाली करत नाचताना दिसते तर कधी आणखी काही. पण जेव्हा वर्णन करण्यासाठी फक्त शब्दच आहेत तेव्हा केवळ शब्दातून अशी चमत्कृती निर्माण करणे हे महाकाव्यांचे वैशिष्टय़ म्हटले पाहिजे. या दृष्टीने माघाचा एक श्लोक पाहू. या एका श्लोकामुळे त्याला ‘घंटामाघ’ अशी उपाधी प्राप्त झाली. त्याचे वर्णन कौशल्य या एका श्लोकावरून ध्यानी यावे.
रैवतक नावाच्या पर्वताचे माघाने अतिशय सुंदर वर्णन केले आहे. हा रैवतक पर्वत म्हणजे गुजरातमध्ये स्थायिक असलेल्या माघाने पाहिलेला गिरनार पर्वत असावा असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. या पर्वताचे वर्णन करताना कृष्णाचा सारथी म्हणतो, हे पहा महाराज, या निळ्या रंगाच्या विशाल आणि उत्तुंग पर्वताच्या एका बाजूला सूर्य उगवू लागला आहे त्याने आपली किरणे रज्जूंप्रमाणे याच्या पृष्ठावर फेकली आहेत तर दुसऱया बाजूला चंद्र अस्ताला जात असता त्याची किरणे ही त्या बाजूला याच्या पृष्ठावर रेंगाळताना दिसत आहेत. हे दृश्य पाहून असे वाटते की, हा महापर्वत एक प्रचंड हत्ती आहे आणि याच्या पाठीवरून टाकलेल्या दोऱयांच्या टोकांना सूर्य आणि चंद्र रुपी दोन तेजस्वी घंटा बांधल्या आहेत.
माघाच्या रसिकदृष्टीचा प्रत्यय येथे नक्कीच येतो. त्याच्या विद्वत्तेचा प्रत्यय देणारी ही अनेक ठिकाणे आहेत. त्याविषयी पुढील लेखात पाहू.
(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाच्या अभ्यासक आहेत.)





























































