
>> अरुण
शीर्षकातला आवाज ‘शिंक’ येते तेव्हाचा. वास्तविक अशा ‘स्वरां’ना शब्दबद्ध करणंच मुळी कठीण. पण त्यातल्या त्यात सर्वमान्य आवाज असाच असावा. कुणी ऐकू येईल न् येईल असं शिंकतो तर कोणी सातमजली बिकट आवाज काढतही शिंकतो. मर्जी ज्याची त्याची. मात्र शिंक एकदा येऊ घातली की टाळता येत नाही हे खरंच.
एका स्वरमैफलीच्या सुरुवातीला पहिल्याच रांगेत बसलेले गृहस्थ ऑssक्… छीss करून शिंकले. श्रोते अर्थातच हसले. बुवाही मिष्किल. ते म्हणाले, ‘तरी बरं, हेच शिंकले… माशी शिंकली असती तर मैफल गुंडाळावी लागली असती!’ गंमत जाऊ द्या. पण माशी ‘शिंकते’ हा शोध ज्याने लावला तो धन्य होत.
माणसाची शिंक मात्र अभ्यासाचा, निरीक्षणाचा विषय होऊन त्याविषयीच्या विस्मयकारी नोंदीही ‘गुगल’सारख्याच ठिकाणी सापडतील. सर्दी होण्याची पूर्वसूचना म्हणून शिंक येते असं पूर्वी मानलं जायचं, परंतु बदलत्या (आणि बिघडत्या) हवामानात ‘अॅलर्जी’ किंवा एखाद्या गोष्टीचं ‘वावडं’ निर्माण झालं तरी शिंका येतात. धूळ हवेतील रसायनं, कसलासा बरा-वाईट उग्र वास किंवा फुलाफळांमधले परागकण (पोलन ग्रेन) यांच्या ‘वावडय़ा’ (अॅलर्जी) शिंक किंवा एकदम पाच-पन्नास शिंका येतात. एरवीही जेव्हा कोणालाही शिंक येते तेव्हा शिंक देण्याचा ‘वेग’ ताशी 160 किलोमीटर एवढा प्रचंड असतो. कुठला तरी नकोसा सुक्ष्मकण श्वसनात आलाय हे कळताच तो चटकन बाहेर टाकण्याची आज्ञा मेंदू देतो आणि नाकातील श्र्लेश्मल त्वचा हुळहुळून खाट्कन शिंक येते!
एका शिंकण्यातून सुमारे 20 हजार ते 1 लाख सुक्ष्म जलकण वेगाने बाहेर पडतात आणि ते सुमारे वीस फुटापर्यंत दूरवर पसरतात! म्हणूनच कोणत्याही कारणाने शिंका येणाऱयांनी ‘रुमाल’ नावाचे नासिकावस्त्र जरूर जवळ बाळगावे. कारण शिंक काही व्हायरस आसपास पसरवू शकते आणि अगदी जवळच्या माणसांना सर्दीची लागणही होण्याचा संभव असतो. शिंकताना किंवा खोकताना लगेच रुमालाचा वापर करावा असं अगदी प्राथमिक शाळेत शिकवलं जातं… पण ‘शिंक संप्रदाया’तील मंडळी अशा सूचना नेहमीच पाळतात असं नाही. एरवी, नको त्या ठिकाणी नाक खुपसू नये हे ठीक, पण शिंक येत असताना (आपल्याच) हात रुमालात जरूर खुपसावं. त्याने इतरांचंही भलं होईल!





























































