आरोग्य – ऋतूनुसार आहार-विहार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. आशुतोष कुलकर्णी, [email protected]

प्रत्येक ऋतूची स्वतची वैशिष्टय़े असतात आणि त्याचा मानवी शरीरावर तसेच पर्यावरणावर वेगवेगळा परिणाम होत असतोऋतूबदलात आरोग्याचा समतोल बिघडू नये यासाठी ऋतूनुसार आहार आचरण असायला हवे.

त्र+तुचर्या ही संकल्पना आयुर्वेदातील सर्व बृहत्तयी ग्रंथांमध्ये (चरक, सुश्रुत व वाग्भट संहिता) सविस्तर सांगितलेली आहे. प्रत्येक ऋतूची स्वतची वैशिष्टय़े असून त्याचा मानवी शरीरावर वेगवेगळा परिणाम होत असतो. ऋतूनुसार आहार व आचरण कसे असावे यासाठी हा लेख उपयुक्त ठरेल.

संपूर्ण वर्ष (12 महिने / 365-366 दिवस) हे सहा ऋतूंमध्ये विभागलेले आहे. यात महत्त्वाचे दोन भाग पडले आहेत. एक म्हणजे आदान काळ. या कालावधीत सूर्य निसर्गाकडून सर्व काही घेत असतो आणि दुसरा कालावधी म्हणजे विसर्ग काळ. सूर्य ह्या काळात पृथ्वीला सर्व काही देत असतो. सूर्याचा उत्तरायण प्रवास म्हणजे आदानकाल किंवा उत्तरायण. याचा कालावधी हिवाळ्याच्या उत्तरार्धापासून उन्हाळ्याच्या उत्तरार्धापर्यंत असतो. यामध्ये पुढील ऋतू येतात ः शिशिर – माघ (जानेवारी ते फेब्रुवारी) (उशिरा येणारा हिवाळा) – फाल्गुन (फेब्रुवारी ते मार्च) वसंत – चैत्र (मार्च ते एप्रिल) (वसंत ऋतू) – वैशाख (एप्रिल ते मे) ग्रीष्म – ज्येष्ठ (मे ते जून) (उन्हाळा) – आषाढ (जून ते जुलै) या कालावधीतील ऋतूंचा विचार केला तर लक्षात येईल की, या कालावधीत सूर्याची तीव्रता जास्त असते. सूर्याचा दक्षिणायन प्रवास म्हणजे विसर्गकाल किंवा दक्षिणायन पावसाळ्यापासून प्रारंभ होऊन प्रारंभिक हिवाळ्यापर्यंत हा कालावधी असतो. यामध्ये पुढील ऋतू येतात.  वर्षा – श्रावण (जुलै ते ऑगस्ट) (पावसाळा) – भाद्रपद (ऑगस्ट ते सप्टेंबर), शरद – आश्विन (सप्टेंबर ते ऑक्टोबर) (शरद ऋतू) – कार्तिक (ऑक्टोबर ते नोव्हेंबर), हेमंत – मार्गशीर्ष (नोव्हेंबर ते डिसेंबर) – पौष (डिसेंबर ते जानेवारी). या ऋतूंच्या विभाजनानुसार आहार-विहार असायला हवा.

शरदहेमंत (नोव्हेंबरचा शेवटडिसेंबरचा पहिला आठवडा) हिवाळ्यात थंड वाऱ्यामुळे जठराग्नी तीव्र होतो व कोणतेही अन्न पचवण्याची क्षमता वाढते.

पथ्यः स्निग्ध, खारट व आंबट आहार, गंडूष व कवल (तोंडात औषधी गुळणी धरणे), तालिसादी चूर्ण – मधासह, त्रिकटु चूर्ण – मधासह अशी औषधे वापरतात.

हेमंतशिशिर (जानेवारी शेवटफेब्रुवारी पहिला आठवडा) या काळात थंडी, वारा व ढगांमुळे कोरडेपणा वाढतो. या काळात सर्दी, आवाज बसणे, ताप,  अंगदुखी, थकवा, घसा खवखवणे असे आजार उद्भवतात. पथ्य ः उबदार ठिकाणी राहणे, वात वाढवणारे तिखट पदार्थ टाळणे, तेल अभ्यंग व स्वेदन, तालिसादी, सितोपलादी चूर्ण, व्योषादी वटका, लवंगादी वटी, महामहालक्ष्मी विलास रस, संजीवनी वटी वैद्यांच्या सल्ल्याने घेणे.

शिशिरवसंत (मार्च शेवटएप्रिल पहिला आठवडा) वसंत ऋतूत साठलेला कफ द्रवरूप होऊन पचनशक्ती कमी करतो. वमनासाठी हा अत्यंत उपयुक्त काळ आहे. कफ साठून न देण्यासाठी वमन अत्यंत उपयुक्त ठरते. पथ्य ः अग्नी वर्धनासाठी आणि पाचनशक्ती सुधारण्यासाठी खदिरादी वटी, चित्रकादी वटी, सूतशेखर रस, आरोग्यवर्धिनी गुटिका या औषधांचा वापर वैद्यांच्या सल्ल्याने करावा.

वसंत–  ग्रीष्म (मे शेवटजून पहिला आठवडा) उन्हाळ्यात सूर्य पृथ्वीतील ओलावा शोषून घेतो. घशात जळजळ, तोंडातील फोड, अतितहान असे अनेक आजार उष्णता वाढल्यामुळे होतात. पथ्य ः घृतपान, दिवसा झोप, चंदन लेप, षडंग पानिय, सरिवाध्यासव, खर्जुरादी मंथ, तीळ तेलाने गंडूष.

ग्रीष्मवर्षा (जुलै शेवटऑगस्ट पहिला आठवडा.) पावसामुळे पचनशक्ती कमी होते व पाणी आम्लीय होते. या काळात अनेक आजार उद्भवतात. घशाचे जंतुसंसर्ग, टॉन्सिलायटिस, अतिसार, उलटी अशा तक्रारी उद्भवतात. पथ्य ः बस्तीकर्म हे या काळातील प्रधान कर्म आहे, ज्यामुळे वाढलेल्या वाताचा निचरा होतो. कुटजारिष्ट, बिल्वादी गुटिका, यष्टिमधु चूर्ण, कवल-गंडूष असे विविध उपचार करणे आवश्यक आहे. आहार अतिशय हलका आणि सुपाच्य असावा.

वर्षाशरद (सप्टेंबर शेवटऑक्टोबर पहिला आठवडा)

या काळात पित्तदोष वाढतो. विरेचन, रक्तमोक्षण करण्याकरिता उपयुक्त काळ आहे. अंगावर पित्त उठणे, त्वचारोग, घशात जळजळ असे पित्ताचे विकार या काळात जाणवतात. पथ्यः हंसोदक – सूर्य व चंद्रकिरणांनी शुद्ध झालेले पाणी, पिण्यास व स्नानास उपयुक्त. खदिरादी वटी, सरिवाध्यासव, महमंजिष्ठादी कषाय असे अनेक औषधांचा वापर करावा लागतो.

ऋतुसंधीतील नियम पाळणे कठीण असले तरी आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ऋतुनुसार आहार-विहार स्वीकारल्यास शरीर ऋतुबदलाशी जुळवून घेते व स्वास्थ्य टिकून राहते.