अनुबंध – नात्यातील गुंतागुंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विजय पांढरीपांडे

आरशावरची धूळ नीट पुसल्याशिवाय जसं काहीच स्वच्छ दिसत नाही तसंच स्वतचे गुणदोष पडताळून पाहिल्याशिवाय नात्यातील धूसरता कमी होत नाही. नात्यातील गुंतागुंत सुधारताना हे आत्मपरीक्षण जास्त महत्त्वाचे ठरते. किंबहुना आपण सुधारल्याशिवाय दुसऱ्याला सांगण्याचा हक्क आपल्याला प्राप्त होत नाही.

अति परिचयात अवज्ञा अशी एक म्हण आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. मग त्यात मानवी संबंधदेखील आले. जेव्हा दोन व्यक्ती खूप जवळ येतात, त्यांना एकमेकांचे स्वभाव, गुणदोष माहिती होतात, आतले उणेदुणे उसळून बाहेर येते तेव्हा आपोआप संबंधात दऱ्या पडायला लागतात. कुटुंबातील प्रत्येक नाते जवळीक वाढली की काळानुसार उसवत जाते.

बाहेर समाजात मित्रांच्या बाबतीत, कामाच्या जागी सहकाऱयांच्या बाबतीतही तेच घडू शकते. आपण कुणावर आंधळा विश्वास टाकतो पण ती व्यक्ती विश्वासार्ह नसते. आपल्या, मोकळेपणाचा गैरफायदा घेतला जातो. आपण दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला जातो. आपल्याच सहृदांकडून… मित्राकडून… आपला विश्वासघात होतो. आपल्याला समज येते तोपर्यंत उशीर झाला असतो. आश्चर्य म्हणजे, अशा चुकापासून आपण फारसे काही शिकत नाही. त्याच त्या चुका आपण पुनः पुन्हा करत जातो. हा मानवी स्वभाव आहे. फार कमी असे असतात जे ठेच लागल्यावर सावध होतात, शहाणे होतात. आपल्याला वाटते, आपलेच चुकले असेल. आपणच कुठेतरी कमी पडलो असणार दुसऱयांना समजून घ्यायला. आपणच कधी कधी स्वतला समजावण्याचा प्रयत्न करतो. करेक्टिव मेजर्स घेण्याचा म्हणजेच चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो. यात वाईट काहीच नाही.पण मानवी संबंध हा वन वे ट्रफिक नाही. दुसरीकडूनही तोच, तसाच पॉझिटिव्ह प्रतिसाद अपेक्षित असतो. टाळी एका हाताने वाजत नाही. म्हणजे एकतर्फी प्रयत्नांना अर्थ नसतो. समोरूनही तसाच पॉझिटिव्ह प्रतिसाद अपेक्षित असतो. पण ते होत नाही सहसा.

माणसे अहंकारी असतात. माझेच खरे, मीच बरोबर हा समोरच्याचा दुराग्रह असतो. अशा वेळी टाळी वाजत नाही. संबंध पुढे जात नाहीत.एक प्रकारचे कुंपण निर्माण होते दोन व्यक्तीत. ते पार करणे दोघांनाही कठीण जाते. पाहिले पाऊल कुणी उचलायचे, माघार कुणी घ्यायची, चूक कुणी आधी कबूल करायची असे हट्टी अहंकार दोघातले अंतर कमी करण्याऐवजी वाढवत जातात.

क्षमाशील असणे हा एक उपाय आहे. दुसऱ्याआधी आपणच स्वतला तपासणे हेही गरजेचे आहे. कधी कधी आपल्या चेहऱ्यावरचे डाग आपल्याला दिसत नाहीत आरशात पाहिल्याशिवाय, आरशावरची धूळ नीट पुसल्याशिवाय! हे आत्मपरीक्षण जास्त महत्त्वाचे संबंध सुधारायच्या प्रक्रियेत. आधी स्वतला सुधारा. पुढचा नंतर सुधारेल.किंबहुना आपण सुधारल्याशिवाय दुसऱ्याला सुधारण्याचा हक्क आपल्याला प्राप्त होत नाही. मीच खोटे बोलत असेन, मीच मोठय़ाने ओरडत असेन तर मला समोरच्या व्यक्तीने चांगले वागावे, प्रामाणिक असावे असा आग्रह धरता येणार नाही. मला तसा नैतिक अधिकार प्राप्त होत नाही.

संघर्ष, ताणतणाव, मतभेद निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, आपल्याला सगळे काही शतप्रतिशत परफेक्ट हवे असते. तडजोडीची आपली तयारी नसते अन् प्रत्यक्षात हे शक्य नसते. इंजिनीयरिंगचे उदाहरण द्यायचे झाले तर ज्याला आयडियल रिस्पॉन्स किंवा रिझल्ट म्हणतो ती अशक्यप्राय गोष्ट समजली जाते. प्रॅक्टिकल रिझल्ट हे नेहमीच खालच्या पातळीवर असतात आयडियल रिझल्टच्या तुलनेत. त्या दोघांतील जो फार फरक असतो त्याला एरर म्हणतात. हा एरर कमी कसा करायचा यातच इंजिनीयरिंग कसब असते. शहाणपण, कौशल्य असते. मानवी नातेसंबंधाचेही तसेच आहे. पूर्णत्व, आदर्श, परफेक्ट हा हव्यास, ध्यास चुकीचा. एखादी वाट आपल्या योग्य नसली तर दुसरा मार्ग शोधा. ही दुसरी वाट अधिक योग्य ठरू शकते. दुसरा उपाय हा की, सारे काही नव्याने पुन्हा सुरू करणे. मागचे विसरून जायचे सगळे. झाले गेले गंगेला मिळाले म्हणत. नव्याने पुन्हा सुरू करायचे नाते. कोऱ्या पाटीवर नवा अध्याय लिहायचा. सगळे पूर्वग्रह विसरून, जुन्या चुकांची पुनरावृत्ती न करता, कसलेही पूर्वग्रह न बाळगता नव्याने तेच गणित सोडवायचे. एक गाणं आहे, त्यात कवी म्हणतो- चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो 

छान सल्ला दिलाय कवीने. एकाच ठिकाणी कुंठीत बसू नका. तेच ते जुने कोळसे उगाळीत बसू नका. पुढे पाऊल टाकत नवी वाट शोधा. हवी ती मंजिल नक्की सापडेल. पुन्हा शेवटी इंजिनीयरिंगचेच तत्त्व सांगतो. प्रत्येक समस्येला उत्तर असतेच. एक नव्हे, तर अनेक उत्तरे असतात. आपल्या सोयीचे, आपल्याला योग्य वाटेल ते आपले उत्तर आपणच शोधायचे असते. तेही तडजोडीची तयारी ठेवून!