
>> प्रतीक राजूरकर
[email protected]
अमेरिकेत मूळची हिंदुस्थानची नागरिक असलेल्या जान्हवी कंडुलाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर तीन वर्षांनी अपघाताची नुकसान भरपाई म्हणून 260 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे तिथल्या न्यायव्यवस्थेने जाहीर केले. जान्हवीचे अपघाती निधन झाल्यावर जितकी चर्चा झाली नाही त्यापेक्षा अधिक चर्चा नुकसान भरपाईच्या रकमेची होत आहे. या घटनेद्वारे अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेने प्रामाणिकतेचे आदर्श उदाहरण जगासमोर मांडले आहे.
हिंदुस्थानात अपघात घडल्यावर आरोपी अल्पवयीन आहे अथवा वयस्क हे निश्चित करण्यातच तपास यंत्रणांचा अनेक वर्षे घोळ संपत नाही. अमेरिकेत मूळची हिंदुस्थानची नागरिक असलेल्या जान्हवी कंडुलाच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूनंतर अपघाताची नुकसान भरपाई म्हणून 29 दशलक्ष डॉलर ( 260 कोटी रुपये) देण्याचे निश्चित झाले आहे.
अमेरिकेच्या इतिहासात पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नुकसान भरपाईपोटी देण्यात येणारी दुसरी मोठ्या रकमेची ही घटना असल्याचे बोलले जाते आहे. नुकसान भरपाईपोटी जान्हवीच्या कुटुंबाला 150 कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम हाती येणार असून उर्वरित रक्कम ही स्थानिक वकिलांचे मानधन व कायदेशीर प्रक्रियेचा खर्च म्हणून वजा होईल.
जानेवारी 2023 मध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या 74 कि.मी प्रति तास वेगाने धावणाऱ्या वाहनाच्या धडकेत जान्हवीचा मृत्यू झाला. सिएटल विद्यापीठात विद्यार्थिनी असलेल्या जान्हवीचा वयाच्या 23 व्या वर्षी असा मृत्यू अतिशय दुर्दैवी. जान्हवीचे वडील आंध्र प्रदेश राज्यात पोलीस खात्यात कार्यरत होते. जान्हवीचा मृत्यूलासुद्धा पोलीस कर्मचारी निमित्त ठरला हा विचित्र योगायोग म्हणावा लागेल. जान्हवीच्या पश्चात नुकसान भरपाई देण्याचा निर्णय होण्याच्या दोन दिवस अगोदर तिच्या वडिलांचे निधन झाले. उज्ज्वल भविष्य असलेल्या जान्हवीच्या कुटुंबावरील आघात कुठल्याही पैशांच्या मूल्याने भरून येणारा नाही.
असंवेदनशीलतेचा कळस
गुन्हेगाराचा पाठलाग करत असताना स्थानिक पोलीस कर्मचारी केव्हिन डेव याने सातत्याने सतर्कतेचा सायरन वाजवत पाठलाग करणे अपेक्षित होते. त्याच वेळी मार्ग ओलांडताना जान्हवीचा अपघात झाला. वाहनाची धडक इतकी तीव्र होती की, जान्हवी 100 फूट दूर फेकली गेली. पोलीस वाहन चालकाचा हलगर्जीपणा जान्हवीच्या अपघाती निधनास कारणीभूत ठरला. जान्हवीच्या अपघाती निधनानंतर पोलीस संघटनेचा पदाधिकारी असलेला डॅनियल ऑडिरीर याने मृतक जान्हवीच्या आयुष्याचे मूल्य 11 हजार डॉलर असल्याचे फोनवर हसत बोलतानाचा पुरावा उपलब्ध असल्याचे प्रकाशित झाले आहे. डॅनियलच्या असंवेदनशीलतेचा कळस समोर आल्याने जान्हवीच्या अपघाताची जागतिक स्तरावर चर्चा होऊ लागली. जान्हवीच्या कुटुंबीयांवर झालेला आघात इतर देशांतील अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबावरील आघातसुद्धा होता.
अपघातापश्चात घडलेला घटनाक्रम
23 जानेवारी 2023 रोजी जान्हवीचे अपघाती निधन झाले. पोलीस वाहन चालक केविनविरोधात तपास यंत्रणांनी कुठलाच गुन्हा दाखल केला नाही. झालेल्या अपघाताने केविनला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले व पाच हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला. कुत्सितपणे हसत आपल्या असंवेदनशील वृत्तीचे प्रदर्शन करणाऱया डेनियलला काही काळानंतर पोलीस प्रशासनातून बडतर्फ करण्यात आले आहे.
जान्हवीच्या मृत्यूपश्चात तिच्या कुटुंबीयांनी स्थानिक न्यायालयात पोलीस प्रशासनाच्या विरोधात नुकसान भरपाईचा दिवाणी दावा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य आणि पोलीस अधिकाऱयांच्या असंवेदनशीलतेचे जागतिक प्रदर्शन या कारणास्तव सिएटल पोलीस प्रशासनाने जान्हवीची बाजू मांडणारे वकील यांच्या समवेत सुरू असलेल्या वाटाघाटी तीन वर्षांनी पूर्णत्वास गेल्या. जान्हवीची बाजू मांडणाऱया वकिलांनी जान्हवीचा अकाली अपघाती मृत्यू व इतर संवेदनशील बाबींवर वाटाघाटीदरम्यान बाजू लावून धरली. प्रकरण न्यायालय व ज्युरींच्या समक्ष विचाराधीन गेले असते तर कदाचित नुकसान भरपाईची रक्कम अधिक वाढली असती. सर्व बाजूंचा विचार करता सिएटल पोलीस प्रशासनास या प्रकरणात तडजोड करण्याची सदसद्विवेकबुद्धी प्राप्त झाली असावी. जान्हवी प्रकरण अधिक काळ प्रलंबित ठेवणे हितावह नसल्याचे लक्षात आल्याने 29 दशलक्ष डॉलरची नुकसान भरपाई सहमतीने निश्चित करण्यात आली. जान्हवीचे कायदेशीर प्रतिनिधित्व सुझान माइंडनबर्ग व सहकारी वकिलांनी केले. 29 दशलक्ष 11 हजार डॉलर नुकसान भरपाई मिळवताना जान्हवीच्या वकिलांनी डॅनियलच्या असंवेदनशील वक्तव्याचे बिनशर्त 11 हजार डॉलर अतिरिक्त देण्याची मागणी सिएटल पोलीस प्रशासनास कळवली. ती अर्थात मान्य करण्यात आली. 29 दशलक्ष डॉलरच्या व्यतिरिक्त 11 हजार डॉलर हे जान्हवीचे आयुष्य मौल्यवान होते हे अधोरेखित करणारी रक्कम म्हणून दखल घ्यावी यासाठीचे आहेत. या घटनेकडे केवळ अपघात म्हणून बघितले जाऊ नये, तर आयुष्य किती अनमोल आहे या दृष्टिकोनातून बघितले जावे हा अतिरिक्त 11 हजार डॉलर मूल्याचा उदात्त हेतू. या संपूर्ण नुकसान भरपाईच्या रकमेतून 20 दशलक्ष डॉलर ही रक्कम विमा कंपनी देणार असून उर्वरित 9 दशलक्ष 11 हजार डॉलर ही रक्कम नागरी निधीतून देण्यात येणार असल्याचे प्रकाशित झाले आहे.
अपघातात होणारे मृत्यू ही जागतिक समस्या आहे. गेलेला जीव कुठल्याही परिस्थितीत परत येऊ शकणारा नाही. नुकसान भरपाई अथवा सांत्वनाचे शब्द गेलेल्या जीवाचे स्मरण देत राहील इतके मर्यादित त्यांचे मूल्य आहे. जान्हवीचे अपघाती निधन झाल्यावर जितकी चर्चा झाली नाही त्यापेक्षा अधिक चर्चा आज नुकसान भरपाईच्या रकमेची होत आहे. जगात आर्थिक नुकसान भरपाई हीच जगत मान्यता आहे.
(लेखक कायदेतज्ञ आहेत.)





























































