म्हाडाच्या दुकानांकडे व्यावसायिकांची पाठ, मुंबईतील 49 दुकाने विक्रीविना पडून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी अर्जदारांच्या उडय़ा पडत असताना दुसरीकडे म्हाडाच्या दुकानांकडे मात्र व्यावसायिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. नुकताच म्हाडाने मुंबईतील 84 दुकानांचा लिलाव केला असून त्यातील केवळ 35 दुकानांची विक्री झाली आहे. बिंबिसार नगर येथील दुकानांकडे व्यावसायिकांनी सपशेल पाठ फिरवली असून 17 पैकी एकाही दुकानाची विक्री झाली नाही.

घरांसोबत म्हाडातर्फे दुकानेदेखील बांधण्यात येतात. अशा विविध योजनाअंतर्गत बांधलेल्या दुकानांचा लिलाव म्हाडातर्फे करण्यात आला. या लिलावात मुलुंड गव्हाणपाडातील 4, पुर्ला स्वदेशी मिलमधील 5, कोपरी पवईतील 15, मॉडेल टाऊन मजासवाडीतील आणि सिद्धार्थ नगर, गोरेगावमधील प्रत्येकी 1, बिंबिसार नगर, गोरेगाव पूर्व येथील 17, मालवणी-मालाड येथील 29 आणि चारकोपमधील 12 दुकाने विक्रीसाठी होती. गेल्या लिलावाच्या तुलनेत यंदाच्या लिलावात दुकानांच्या किमती करूनही निम्म्याहून अधिक दुकानांची विक्री झालेली नाही.

चुकीची बोली लावल्याने चार लाखांचा फटका

कोपरी पवईतील एका दुकानासाठी अर्जदाराने चुकीची बोली लावली. त्यामुळे या अर्जदाराची चार लाख रुपयांची अनामत रक्कम जप्त होणार आहे. गेल्या लिलावातदेखील चुकीची बोली लावल्यामुळे एका अर्जदाराला अनामत रक्कम गमवावी लागली होती.

…तर दुकानांची प्राधान्य तत्त्वावर विक्री

दोन वेळा लिलाव करूनही विक्री न झाल्यास ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर दुकानांची विक्री केली जाणार आहे. प्राधिकरणाच्या बैठकीत यासंदर्भात ठराव मंजूर झाला आहे.

56 कोटींचा महसूल

35 दुकानांच्या विक्रीमधून म्हाडाला तब्बल 56 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मालवणीतील 29 पैकी 14 दुकानांची विक्री झाली आहे. कोपरी पवईमधील एका दुकानाची लिलावात तब्बल 4 कोटी 20 लाखांना विक्री झाली आहे. म्हाडाने या दुकानाची बेस प्राईज 1 कोटी 43 लाख रुपये ठेवली होती.