
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे महाराष्ट्रात पुढील पाच दिवस तापमानात वाढ होणार आहे तर दक्षिणेकडील दहा राज्यांमध्ये पाऊस पडणार आहे. या बदलत्या वातावरणाबाबत हवामान खात्याकडून तामीळनाडूपासून केरळपर्यंत सतर्कतेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
नैऋत्य बंगालच्या उपसागरावर आणि हिंदी महासागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे 21 फेब्रुवारीपासूनच 24 फेब्रुवारीदरम्यान तामीळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार बेटे व इतर भागात गडगडाट, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तामीळनाडू आणि केरळमधील अनेक जिह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यावेळी ताशी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान, वायव्य हिंदुस्थानातील राज्यांमध्ये पुढील सात दिवसांत तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसनी वाढण्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
























































