
आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये आज सुपर-8मध्ये हिंदुस्थानचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर सायंकाळी 7 वाजता हा सामना रंगणार आहे. या लढतीपूर्वी सलामीवीर अभिषेक शर्मा याचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणाऱ्या अभिषेक शर्माची पाटी अद्यापही कोरी आहे. तीनही सामन्यात तो शून्यावर बाद झाला आहे. आता सुपर-8 मध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान अभिषेक शर्माने संघापुढे प्रोत्साहनपर भाषण दिले. हे भाषण ऐकून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही हसू आवरले नाही. बीसीसीआयने आपल्या एक्स हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिषेक शर्मा संघासमोर आपले विचार मांडताना दिसत आहे. फ्लडलाइट्सच्या खाली हिंदुस्थानी खेळाडू एकत्र जमलेले असताना अभिषेकने टीम हडलमध्ये एन्ट्री केली. त्याने छोटे पण उत्साहाने भरलेले भाषण दिले. ही एका चॅम्पियन संघाची ओळख आहे. आपण एकमेकांच्या कामगिरीचा आनंद घेऊया. सध्या आपण हीच सर्वात चांगली गोष्ट करत आहोत. सर्व सामन्यांमध्ये आपण जी ऊर्जा दाखवत आहोत ती थक्क करणारी आहे. आपण येथे सर्व सामने जिंकण्यासाठी आलो आहोत, असे अभिषेक म्हणाला.
अभिषेकने आपल्या भाषणाच्या शेवटी ‘जो बोले सो निहाल, सत श्री अकाल’ असे म्हणाला. त्याच्या या शैलीवर संपूर्ण संघाने जोरदार प्रतिसाद दिला. यावेळी गंभीर स्वभावाचे हेड कोच गौतम गंभीरही स्वतःला रोखू शकले नाहीत आणि खळखळून हसले.
Episode 4 of The Speech had one clear message: Keep enjoying the success of each other! 👍 👍#TeamIndia 🇮🇳 | #T20WorldCup | #MenInBlue | #INDvNED | @OfficialAbhi04 https://t.co/bqB5j4JUXD
— BCCI (@BCCI) February 20, 2026
शून्याचे ग्रहण
टी-20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी अनेक आजी-माजी खेळाडू आणि तज्ज्ञांनी नंबर वन बॅटर अभिषेक शर्मा सर्वाधिक धावा करेल असा अंदाज वर्तवला होता. परंतु या वर्ल्ड कपमध्ये त्याच्या बॅटमधून अद्याप एकही धाव निघालेली नाही.अमेरिका, पाकिस्तान आणि नेदरलँड्स या तिन्ही संघांविरुद्ध तो शून्यावर बाद झाला. तर आजारपणामुळे तो नामिबियाविरुद्धचा सामना खेळू शकला नव्हता.


























































