
गोरखपूर-मुंबई या अवध एक्सप्रेसमधून वांद्रे रेल्वे पोलिसांनी 13 कोटी 83 लाख रुपयांचे चरस जप्त केले आहे. घडल्या प्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. यंदाच्या वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात चरस जप्त केल्याची ही पहिलीच घटना आहे.
शनिवारी सायंकाळी गोरखपूर येथून वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक-4 वर अवध एक्सप्रेस आली. तेव्हा फलाटावर गस्तीवर असलेले पोलीस संशयिताच्या बॅगेची तपासणी करत होते. तेव्हा एका सफाई कर्मचाऱयाला जनरल डब्यात एक बॅग दिसली. त्याने याची माहिती वांद्रे रेल्वे पोलिसांना दिली. त्या माहितीनंतर रेल्वे कर्मचारी, श्वान पथक आणि फॉरेन्सिकचे पथक घटनास्थळी आले. पोलिसांनी त्या बॅगेची तपासणी केली. त्यात 31 पॅकेट होते. त्या पॅकेटमध्ये उच्च प्रतीचे चरस होते.
पोलिसांनी कारवाई करून एकूण 13 किलो 834 ग्रॅम चरस जप्त केले. जप्त केलेल्या चरसची किंमत सुमारे 13 कोटी 83 लाख रुपये इतकी आहे. ते चरस गोरखपूर येथून मुंबईला पाठवल्याचा पोलिसांना संशय आहे.
























































