
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरवरून (FIR) भारतीय जनता पक्षावर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. “भाजप हा सनातनविरोधी पक्ष असून शंकराचार्यांसारख्या थोर संतांवर कारवाई करणे, हा संपूर्ण हिंदू धर्माचा आणि परंपरेचा अपमान आहे,” असा गंभीर आरोप यादव यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकराचार्यांच्या विधानांवरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेशातील राजकारण तापले आहे. अखिलेश यादव यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला असून, भाजपने धर्माचा केवळ राजकीय स्वार्थासाठी वापर केला, असे ते म्हणाले. यादव म्हणाले की, “जे स्वतःला धर्माचे रक्षक मानतात, तेच आज महान संतांचा छळ करत आहेत. शंकराचार्यांवर एफआयआर दाखल करणे हे भाजपचे खरे सनातनविरोध स्वरूप उघड करते.”
अखिलेश यादव यांनी पुढे म्हटले की, जेव्हा जेव्हा धार्मिक गुरूंनी सत्तेला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भाजपने त्यांच्यावर दडपशाहीचा मार्ग अवलंबला आहे. ही कारवाई केवळ एका व्यक्तीवर नसून ती संपूर्ण आस्थेवर केलेला आघात आहे.
या प्रकरणावरून आता समाजवादी पक्ष आक्रमक झाला असून, उत्तर प्रदेशात या मुद्द्यावरून राजकरण तापले आहे. भाजपने अद्याप या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र या एफआयआरमुळे शंकराचार्यांच्या अनुयायांमध्ये आणि राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे.



























































