
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासातील टॉवर 1 मधील घरांच्या वितरणाचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. येथील घरे आम्हाला मिळणे अपेक्षित होती. तसे न करता राजकीय दबावाने ही घरे पोलिसांना दिल्याचा आरोप करत शेकडो रहिवाशांनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने 329 कुटुंबांच्या नवीन घरांच्या लॉटरीला स्थगिती दिली आहे.
अॅड. नंदकुमार बागवे यांच्या मार्फत येथील बीडीडीतील 329 घरांतील रहिवाशांनी ही याचिका दाखल केली आहे. न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरती साठे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. 2021 च्या आराखडय़ाप्रमाणे या 329 कुटुंबांना टॉवर 1 मध्ये घरे मिळणार होती. मात्र 2025 मध्ये म्हाडाने नवीन आराखडा सादर केला व या टॉवरमधील घरे पोलिसांना दिली. आता या 329 कुटुंबांना अन्य टॉवरमध्ये घरे दिली जाणार आहेत. ही कृती बेकायदा असल्याचा दावा अॅड. बागवे यांनी केला.
2021 च्या आराखडय़ानुसार आम्हाला टॉवर क्रमांक 1 मध्येच घर द्यावे, अशी प्रमुख मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने या कुटुंबांसाठी काढण्यात येणाऱ्या लॉटरीला स्थगिती दिली. या याचिकेवर म्हाडाने आपले म्हणणे सादर करावे. या कुटुंबांच्या पात्रतेचा तपशील सादर करावा, असे आदेश देत खंडपीठाने ही सुनावणी एक आठवडय़ासाठी तहकूब केली.
सहा चाळींतील रहिवासी
वरळी बीडीडी चाळ क्रमांक 12, 13, 14, 15, 21 व 29 मधील 329 रहिवाशांनी ही याचिका दाखल केली आहे. येथील सुमारे दहा हजार घरांचा पुनर्विकास होणार आहे. यासाठी 2021 मध्ये म्हाडाने आराखडा तयार केला. कोणत्या इमारतींना कोणत्या टॉवरमध्ये नवीन घर मिळणार याचा तपशील या आराखडय़ात होता. या आराखडय़ानुसार टॉवर क्रमांक 3 व 5 मध्ये पोलिसांना घरे दिली जाणार होती, मात्र गेल्या वर्षी अचानक पोलिसांना टॉवर 1 मध्ये घरे मिळणार असल्याचे म्हाडाने जाहीर केले. कोणतीही नोटीस न देता 2021 चा आराखडा रद्द करण्यात आला आहे. राजकीय दबावाने हा बदल केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
90 वर्षांपासून वास्तव्य
याचिकाकर्ते अजूनही बीडीडी चाळीतच राहत आहेत. म्हाडाकडून या रहिवाशांना घरे रिकामी करण्यास सांगितले जात आहे. 90 वर्षांपासून ही कुटुंबे बीडीडी चाळीत राहत आहेत. टॉवर क्रमांक 1 मध्ये 2288 घरे आहेत. 2021 च्या आराखडय़ाप्रमाणे या कुटुंबांना टॉवर क्रमांक 1 मध्येच नवीन घरे मिळायला हवे. म्हाडाने या कुटुंबांना अन्य टॉवरमध्ये घर देण्याचा घाट घातला आहे, असे अॅड. बागवे यांनी सांगितले.
































































