
मुंढवा जमीन घोटाळ्यात शीतल तेजवाणी प्रमुख आरोपी असून तिच्या विरोधात अन्य पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. तसेच तिला रीतसर नोटीस बजावण्यात आली असतानाही तपासात सहकार्य करत नसल्याने तिला अटक करण्यात आल्याचा दावा राज्य सरकारच्या वतीने आज हायकोर्टात करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला.
पुणे जमीन घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवाणीला 3 डिसेंबर रोजी अटक केली होती. त्याच प्रकरणात बावधन पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला. तसेच खडक पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत शीतल तेजवाणी हिने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे
या याचिकेवर आज सोमवारी न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी तेजवाणीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने आपल्या अशिलाला अटक केली असून अटक करताना कोणतीही नोटीस बजावण्यात आली नाही. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन झाले आहे. राज्य सरकारच्या वतीने हा युक्तिवाद फेटाळण्यात आला व न्यायालयाला सांगण्यात आले की, तेजवाणी हिला अटक का करण्यात आली याची तिला माहिती असून तिने तपासात सहकार्य केले नाही. याशिवाय तिने इतर प्रकरणातही फसवणूक केली आहे त्यामुळे तिचा अर्ज फेटाळून लावावा. न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेत निकाल राखून ठेवला.
बँकेला 238 कोटींचा चुना
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वतीने सरकारी वकील श्रीकांत गावंड यांनी माहिती देताना सांगितले की, शीतल तेजवाणी तिचा पती व कंपन्यांनी 2019 साली सेवा विकास को-ऑप. बँक पिंपरीकडून करोडो रुपयांची कर्जे घेतली आहेत. 238 कोटी इतकी रक्कम तेजवाणीने थकवली आहेत. चौकशीअंती ही माहिती बाहेर पडली असून न्यायालयाने तिला या प्रकरणात कोणताही दिलासा देऊ नये.






























































