
अनिर्बंध वृक्षतोड आणि हवामान बदलामुळे निसर्गाचा समतोल ढासळत असून मुंबईत प्रदूषण वाढत आहे. या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व मुंबईतील पर्यावरण रक्षणासाठी नियोजित पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि तज्ञांचा समावेश असलेली एक ‘वैधानिक समिती’ तातडीने स्थापन करावी, अशी आग्रही मागणी शिवसेना नगरसेवक अंकित प्रभू यांनी केली आहे.
अंकित प्रभू यांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. महापालिकेचे विविध विभाग पर्यावरण रक्षणासाठी काम करत असले तरी, त्यांच्यामध्ये नियोजन आणि समन्वयाचा अभाव आहे. वैधानिक समिती स्थापन झाल्यास ती समिती महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये समन्वय साधून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काम करेल, असे त्यांनी म्हटले आहे.
उपलब्ध पाण्याचे नियोजन आवश्यक
मुंबईची वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि त्यामुळे निर्माण होणाऱया पाण्याच्या टंचाईकडेही अंकित प्रभू यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. केवळ नवीन स्रोत शोधण्यापेक्षा उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. मुंबईतील मलनिःसारण आणि सांडपाण्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावर प्रशासनाने भर द्यावा, जेणेकरून पिण्याच्या पाण्याची बचत होईल,’ अशी सूचनाही त्यांनी केली आहे. पाणीपुरवठा आणि मलनिःसारणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठीदेखील समिती स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.






























































