आम्ही पाच नाही तर सात नगरसेवक, पनवेल महापालिकेत शिवसेनेला स्वतंत्र दालन द्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पनवेल महानगरपालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तांत्रिकदृष्ट्या पाच नगरसेवक असले तरी प्रत्यक्षात सात नगरसेवक आमच्यासोबत आहेत. त्यामुळे पालिकेत आम्हाला स्वतंत्र दालन द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते बबन पाटील आणि जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी केली आहे. सभागृहात पनवेलकरांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना प्रयत्नांची पराकाष्टा करेल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

गट स्थापनेच्या प्रक्रियेत पाचजण शिवसेनेच्या गटात तर दोनजण शेकाप-काँग्रेस आघाडीच्या गटात दिसत असले तरी कामकाजासाठी हे सातही जण एकत्र राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे व नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांची शिवसेना उपनेते बबन पाटील आणि जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी भेट घेऊन स्वतंत्र दालनाची मागणी केली आहे.

उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, महानगरप्रमुख अवचित राऊत, गटनेत्या लीना गरड, नगरसेविका प्रिया गोवारी, उत्तम मोर्वेकर, रितिक्षा गोवारी, मेघना घाडगे, प्रगती पाटील, आर्या जाधव, शहरप्रमुख प्रवीण जाधव, नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, संतोष गोळे, सुनील गोवारी, कैलास पाटील, सदानंद शिर्के आदी यावेळी उपस्थित होते. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापौर व आयुक्तांसोबत शहरातील विकासकामांबाबतही चर्चा केली.

पनवेल महानगरपालिकेत एकूण 78 नगरसेवक असून भाजपचे 59 तर महाविकास आघाडीचे 18 नगरसेवक आहेत. पालिकेत एक अपक्ष नगरसेवक निवडून आला असून सत्ताधारी भाजपच्या कारभारावर वॉच ठेवण्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे.

खारघर, कळंबोली वसाहत येथे भीषण पाणीटंचाई सुरू झाली आहे. तसेच मालमत्ता कराचा विषयही महत्त्वाचा असून या दोन्ही प्रश्नांवर आमचे सातही शिलेदार सभागृहात आवाज उठवतील, असा विश्वास जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी व्यक्त केला आहे.

जनतेचे प्रश्न मांडणार

पनवेल महापालिकेत आमची युती भक्कम असून महाविकास आघाडी म्हणून महासभेत जनतेचे प्रश्न आम्ही मांडणार आहोत. गटनेत्याला नियमानुसार मिळणारे स्वतंत्र कार्यालय किंवा दालन आम्हाला मिळावे ही प्रमुख मागणी आहे, असे शिवसेना उपनेते बबन पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.