
अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्तींमुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे उत्पादनावर परिणाम होऊन निर्यातीला मोठा फटका बसला आहे. उत्पादन कमी झाल्याने जेएनपीएतील द्राक्षांची निर्यात 50 टक्क्यांनी घटली आहे. सातत्याने बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट झाली असून यावर्षीचा द्राक्षांचा हंगाम बागायतदार, निर्यातदार, व्यापारी, वाहतूकदारांसाठी आंबट ठरला आहे.
जेएनपीए बंदरातून महाराष्ट्रातील बागायतदार, व्यापारी, शेतकऱ्यांकडून दरवर्षी डिसेंबर ते मार्चदरम्यानच्या हंगामात 14000 कंटेनर द्राक्षांची परदेशात निर्यात केली जाते. यावर्षी मात्र द्राक्षे उत्पादनाला उतरती कळा लागली आहे. यावर्षी द्राक्ष हंगाम बहरलाच नाही. यामुळे द्राक्षांचे उत्पादन घटले आहे. हवामानातील अनिश्चिततेमुळे द्राक्षवेलीत घडनिर्मितीवरही परिणाम झाल्याने उत्पादनात नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र राज्यातून युरोप, रशिया, मलेशिया, सिंगापूर आदी देशांमध्ये सर्वाधिक द्राक्षे निर्यात केली जातात. मात्र यावर्षीच्या हंगामात द्राक्षे उत्पादनात 50 टक्क्यांहून अधिक घट झाल्यामुळे चालू हंगामात द्राक्ष निर्यात संथ गतीने सुरू असून त्यात मोठी घट झाली आहे.
मोठा आर्थिक फटका
जेएनपीएतील निर्यात 50 टक्क्यांनी घटल्याने निर्यातदार व्यापारी, बागायतदार, शेतकरी, वाहतूकदारांचे कंबरडे मोडले आहे. सर्वांनाच आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले असल्याची माहिती श्वान ओव्हरहेड एक्सपोर्ट कंपनीचे व द्राक्षे निर्यातदार व्यापारी राहुल पवार यांनी दिली.
अवघे 7000 कंटेनर निर्यात
मागील वर्षीच्या हंगामात जेएनपीए बंदरातून 14000 कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली होती. मात्र बदलते हवामान द्राक्षे उत्पादनाला मारक ठरले आहे. उत्पादन घटल्याने यावर्षीच्या हंगामात जेएनपीए बंदरातून अवघ्या 7000 कंटेनर द्राक्षांची निर्यात झाल्याची माहिती रिफर कंटेनर ट्रान्सपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संजय पोतदार यांनी दिली.
































































