
पोलीस शिपाई पदाच्या भरतीदरम्यान उत्तेजक इंजेक्शन टोचणाऱ्या उमेदवाराला अमली पदार्थ तपासणी पथकाने रंगेहाथ पकडले आहे. साहिल अवघडे (23) असे या उमेदवाराचे नाव असून तो पुण्याच्या बारामतीतील रहिवासी आहे. याप्रकरणी प्रशासनाने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला भरती प्रक्रियेतून तत्काळ बाद केले आहे.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई व चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. भाईंदरमधील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात या भरतीची मैदानी चाचणी सुरू आहे. या चाचणीदरम्यान अमली पदार्थ तपासणी पथकाचे कर्मचारी साध्या वेशात गस्त घालत असताना त्यांना साहिल अवघडे हा उमेदवार दंडामध्ये इंजेक्शनच्या मदतीने उत्तेजक द्रव्य टोचताना दिसला. त्यानुसार पथकाने त्याला रंगेहाथ पकडून वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले असता त्याने उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार प्रशासनाने बडगा उगारत साहिलला भरती प्रक्रियेतून बाद करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे.
































































