
समुद्रकिनारी करण्यात येणारा भराव, समुद्रात सोडण्यात येणारे कंपन्यांचे रासायनिक पाणी, बदलते हवामान, प्रदूषणाचा फटका मत्स्य उत्पादनाला बसला आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून रायगडच्या समुद्रातील माशांची घरे उद्ध्वस्त होत असून जिल्ह्यात मत्स्य उत्पादन घटले आहे. सरासरी चार हजार मेट्रिक टन मत्स उत्पादन घटल्याचे वास्तव मत्स्य व्यवसाय विभागाकडील आकडेवारीतून समोर आले आहे.
रायगड जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी वर्षाला 39 ते 40 हजार मेट्रिक टन मासेमारी करण्यात येत होती. मात्र मागील काही वर्षांत जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन घटत चालले आहे. 2023 पासून 2025 पर्यंत जिल्ह्यात 35 ते 36 हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन झाले. त्यातच प्रमुख माशांच्या प्रजातींचेही उत्पादन घटल्याने मासेमारीच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे. सरकारी उदासीनतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यातील कंपन्यांचे रासायनिक पाणीही समुद्रात सोडण्यात येत असल्याने मत्स्य उत्पादन घटले असल्याचे मच्छीमार सांगतात. प्राकलन समितीच्या निकषानुसार मत्स्य विभागामार्फत मासळीची मोजणी केली जाते. सलग तीन वर्षे उत्पादनात 50 टक्क्यांहून अधिक घट झाल्यास मत्स्य दुष्काळ जाहीर करता येतो. मात्र रायगड जिल्ह्यात अशी परिस्थिती नसल्याने जिल्ह्यात मत्स्य दुष्काळ नसल्याचे रायगडचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
30 हजार कुटुंबांना झळ
राज्याला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱ्यावर दर्जेदार मासळी मिळते. त्यासाठीच कोकणची किनारपट्टी ओळखली जाते. रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील 112 गावांमध्ये मासेमारीचा व्यवसाय चालतो. 4 हजार 943 नौकांच्या माध्यमातून 30 हजार कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र मत्स्य उत्पादन घटल्याने मासेमारांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे. याची झळ सर्वच घटकांना बसत आहे. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात सरासरी 39 ते 40 हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन होत होते. यामध्ये घट होऊन सध्या 35 ते 36 हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन होत आहे.
जिताडे, पाला, वाम, शेवंड गायब
जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात घट झाली असतानाच बाजारात जास्त दर असलेल्या जिताडे, पाला, रावस, दाडा, ताम, वाम आणि शेवंड या जातीच्या मासळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे मासेमारांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात सध्या पापलेट, सुरमई, रावस, भाकस, कोलंबी, माकुल, मांदेली, बांगडा, बोंबील या जातींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने मासेमारांना थोडा दिलासा मिळाला आहे.































































