
ठाणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची दहशत जीवघेणी ठरत आहे. दिव्यात निशा शिंदे या चिमुकलीचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्यानंतर तिला रेबीजची चार इंजेक्शन दिली. त्यानंतरही तिचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये कुत्रा चावल्यानंतर रेबीजच्या भीतीने एका ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आयश अमीन असे मृत तरुणाचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी तिसगाव नाका परिसरात एका भटक्या कुत्र्याने आयशच्या पायाचा लचका तोडला होता. श्वान चावल्यानंतर तातडीने पूर्ण उपचार घेणे आवश्यक असताना त्याने केवळ एकच रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन घेतले. पुढील लसीकरण पूर्ण केले नाही. यानंतर चार दिवसांपासून आयशच्या वागण्यात बदल जाणवत होते. पाणी पाहून भीती वाटणे, अस्वस्थ हालचाली करणे अशा लक्षणांमुळे कुटुंबीय चिंतेत होते. त्यातच रविवारी सायंकाळी आयश घरी एकटाच असताना त्याने गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यामध्ये आत्महत्येचे कारण नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवला आहे.
संपूर्ण लसीकरण गरजेचे
भटक्या श्वानांचा वाढता वावर आणि रेबीजचा संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी श्वानदंश झाल्यास तातडीने संपूर्ण लसीकरण करून घ्यावे, तसेच उपचार अर्धवट सोडू नयेत, असे आवाहन केडीएमसी प्रशासनाने केले आहे.






























































