
देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. वाढलेले धुलीकण, धुरके याचा त्रास लहान मुले, वृद्ध नागरिक आणि श्वसनविकाराच्या रुग्णांना सोसावा लागत आहे. यावरून अनेकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला जाब विचारला. आता पुन्हा एकदा मुंबईतील हवेच्या खालावलेल्या स्तरावर चिंता व्यक्त करत आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेला धारेवर धरले आहे.
आदित्य ठाकरे यांनी X वर यासंदर्भात ट्वीट केले आहे. या पोस्टमध्ये बीएमसीच्या अधिकृत अकाऊंटला टॅग करत त्यांनी म्हटले की, जरा खिडकीतून बाहेर डोकावून बघा… तुम्हाला काहीतरी पांढरे आणि धुसर दिसेल… ते प्रदूषण आहे. हीच दूषित हवा आपण सर्वजण श्वसना वाटे आत घेत आहोत,” अशा शब्दांत त्यांनी सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य मांडले.
Hey @mybmc please look outside the window… you will see something white and hazy. That’s the pollution we all are breathing in.
⚠️ Please halt all private construction for a week. ⚠️
⚠️ Make a construction management schedule. ⚠️
⚠️ Implement your rules of anti pollution…— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 24, 2026
प्रदूषणाच्या या संकटावर मात करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. मुंबईतील सर्व खासगी बांधकामे किमान एक आठवड्यासाठी तातडीने थांबवण्यात यावीत. तसेच, प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र बांधकाम व्यवस्थापन वेळापत्रकतयार करावे आणि प्रदूषणाविरुद्धच्या नियमांची कडक अंमलबजावणी झाल्यानंतरच पुढील कामांना परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, सामान्य मुंबईकरांचा जीव गुदमरतोय याने तुम्हाला काहीच फरक पडत नाहीये. फक्त कोणताही व्हीआयपी आठवडाभरासाठी शहरात येतोय असे समजा, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी पुन्हा टीका केली.
किमान आठवडाभर मुंबईतील खासगी बांधकामे रोखा! आदित्य ठाकरे यांचे पालिका आयुक्तांना पत्र






























































