श्वानांसोबत अमानुष वर्तन करणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तींना भर चौकात शिक्षा द्या, आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती संभाजीनगरमधील एका अॅनिमल शेल्टरमध्ये भटक्या कुत्र्यांसोबत होणाऱ्या अत्याचाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने या संस्थेला भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची आणि त्यांच्यावरील उपचाराची जबाबदारी दिल्याचे समजते. या संस्थे विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहले आहे. तसेच श्वानांसोबत अमानुष वर्तन करणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तींना भर चौकात शिक्षा द्या, अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे.

”छत्रपती संभाजीनगर येथे घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून संबंधित छायाचित्रे व उपलब्ध माहितीवरून भटक्या श्वानांशी अत्यंत अमानुष व क्रूर वर्तन करण्यात आल्याचे दिसून येते. उपलब्ध माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित संस्था ही रांची येथे नोंदणीकृत असून या संस्थेला परदेशातून CSR निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत असल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे. तरी आपण या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन खालीलप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश द्यावेत”, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांच्या मागण्या –

१) छत्रपती संभाजीनगर येथे घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित संस्था व त्यातील जबाबदार व्यक्तींवर तात्काळ गुन्हा नोंद करून अटक करण्यात यावी.
२) भटक्या श्वानांसोबत अमानुष वर्तन करणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तीना भर चौकात त्याचप्रकारे शिक्षा द्यावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत.
३) संबंधित संस्थेचा FCRA परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा.
वरील बाबींची तात्काळ व गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी.