
मद्यपी चालकांमुळे होणाऱया अपघाताच्या मुद्दय़ावर शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी आज सरकारला धारेवर धरले. चालकाने मद्यपान केले असेल तर बस सुरूच होणार नाही, असे ‘एआय’ तंत्रज्ञान सरकार आणणार होते, त्याचे काय झाले? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी करताच विधानसभेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकही गडबडले.
राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात आणि खासगी ट्रव्हल्सच्या मनमानीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेत आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईतून बाहेर पडणाऱया स्लिपर बसेसचे चालक लेन डिसिप्लीनचे पालन करत नाहीत. या बसेस बाहेरून पाहिल्या तरी भीती वाटते. वरच्या बर्थवर झोपलेला प्रवासी खाली पडला तर काय होईल, अशी परिस्थिती असते.
सीसीटीव्ही आणि डिजिटल दंडाला आता कोणीही घाबरत नाही. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर होणारी वाहतूककोंडी हे या बेशिस्त ड्रायव्हिंगचेच फळ आहे, असेही त्यांनी नमूद केले.
हायवेवरील अपघाताचे डार्क स्पॉट ओळखा
लेन डिसिप्लीन, सीट बेल्ट यांच्या तपासणीप्रमाणेच हायवे पेट्रोलिंगवर भर देण्यात यावा. ओव्हरस्पीडिंगमध्ये गाडीचा टायर फुटतो, इमर्जेन्सी व्हेहीकलसाठी डिव्हायडरच्या मधे यू -टर्न ठेवलेला असतो; पण तो कुणीतरी उघडून त्यातून प्रवास करतात, टनेलमधून बाहेर पडताना लाईट्समध्ये फरक पडतो. या सर्व बाबींचा आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात अशी सूचना आदित्य ठाकरे यांनी केली.



























































