
बंगळुरूत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयव्ही ड्रिप काढताना डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सहा महिन्यांच्या बाळाचे डाव्या हाताचे शेवटचे बोट कापले गेले. इंदिरानगर येथील चिन्मय मिशन रुग्णालयात ही घटना घडली. याप्रकरणी नातेवाईकांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिसांनी नर्स, डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 ते रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान ही घटना रुग्णालयात घडली. मुलाच्या वडिलांनी नर्स, उपचार करणारे डॉक्टर आणि चिन्मय मिशन हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
फिर्यादी विजय कुमार यांचा सहा महिन्यांचा मुलगा बालकुमार व्ही याला 19 फेब्रुवारी रोजी तीव्र ताप आणि सर्दी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टर मीनाक्षी यांनी बाळावर उपचार केले. 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयाचे बिल मंजूर झाल्यानंतर आणि डिस्चार्जची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, नर्स अनिता यांनी आयव्ही ड्रिप काढताना बाळाच्या डाव्या हाताचे शेवटचे बोट कापल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.
मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार नर्स, डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेयोहॉल येथील 10 व्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात हा खटला पाठवण्यात आला आहे.



























































