
मुलुंड मेट्रो दुर्घटनेत एका नागरिकाचा नाहक गेलेला जीव आणि पाच जण जखमी झाल्यामुळे मुंबईत सुरू असलेल्या सर्वच प्रकल्प बांधकामांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी मेट्रोसह मुंबईतील सर्वच प्रकल्प बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक अंकित प्रभू यांनी पालिका सभागृहात करीत चर्चेची मागणी केली. मात्र सत्ताधाऱयांनी चर्चेला विरोध केला. त्यामुळे संतप्त विरोधकांनी सभात्याग केला.
मुलुंड पश्चिम येथील लाल बहादूर शास्त्राr मार्गावर मेट्रो-4 च्या कामादरम्यान पुलाचा मोठा भाग कोसळून झालेल्या भीषण अपघाताबाबत शिवसेना नगरसेवक अंकित सुनील प्रभू यांनी प्रशासकीय यंत्रणेवर बेजबाबदारपणाबद्दल तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. मागील आठवडय़ात जॉन्सन ऍण्ड जॉन्सन कंपनीजवळ घडलेल्या या दुर्दैवी घटनेत एका निष्पाप नागरिकाचा बळी गेला असून 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अंकित प्रभू यांनी मेट्रो प्रशासनावर मानवी जीवितापेक्षा कामाच्या वेगाला महत्त्व असल्याचा आरोप केला आहे. मुलुंडसारख्या गजबजलेल्या भागात सुरक्षा नियम, चोख वाहतूक नियोजन आणि तांत्रिक तपासणी या त्रिसूत्रीचा अभाव स्पष्टपणे दिसून येत असून, यामुळे पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असल्याचे प्रभू यांनी म्हटले आहे. मुलुंड मेट्रो दुर्घटनेची नैतिक जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. परंतु सत्ताधाऱयांनी ही चर्चा होऊ दिली नाही याच्या विरोधात विरोधकांनी सभात्याग केला.



























































