
माळशेज घाटमार्गे पुणे शहराला जोडणाऱ्या वाशाळा ते कसारा रस्त्याची अधिकारी, ठेकेदाराच्या मिलीभगतमुळे चाळण झाली आहे. परिसरातील 17 शाळांना जोडणाऱ्या नागमोडी व चढ-उतार असलेल्या खड्डेमय रस्त्यांमुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मुंबई-नाशिक महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.
शहापूर तालुक्यातील हा रस्ता तब्बल 17 शाळांना जोडतो. नादुरुस्त रस्त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या मनात सतत अपघाताची भीती असते. रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून त्याचा कालावधीही संपत आला तरीही ठेकेदाराने एप्रिल 2025 पासून काम बंद ठेवले आहे. वाशाळा, वेळूक, ढाकणे, कोथळे, फुगाळे, कलभोंडा, कोठारे, तलवाडा व डोळखांब ग्रामपंचायतींसह अनेक गाव-पाड्यांसाठी हा एकमेव मार्ग असून तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करावे, तीव्र वळणे व चढ-उतार कमी करून सुरक्षितता वाढवावी, धोकादायक झाडेझुडपे हटवून रस्ता मोकळा करावा, पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे व मोऱ्यांची व्यवस्था करावी, नवीन पुलाचे अंतर वाढवून उंची वाढवावी, भावली धरण योजनेचे काम रस्त्याला अडथळा ठरणार नाही याची दक्षता घ्यावी, रस्त्याची मंजूर रुंदी कायम ठेवावी तसेच संरक्षण भिंतीतील झाडे काढून भिंतीची मजबुती सुनिश्चित करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख बाळा धानके यांनी केली आहे.
अपघातांची मालिका
शहापूर तालुक्यातील वाशाळा ते कसारादरम्यान रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे गेल्या महिन्यात जांभूळवाड येथील एका युवकाचा अपघातात मृत्यू झाला होता. टोकरखांड येथील शिक्षकाला या रस्त्यावर झालेल्या अपघातात कायमचे अपंगत्व आले असून सोबतची शिक्षिका गंभीर जखमी झाली. चिंध्याची वाडी येथील युवकही अपघातामुळे कायमचा अपंग झाला असून गेल्या पाच वर्षांत झालेल्या अपघातांमुळे त्यांची मोजदाद करणेही कठीण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.



























































