
नालासोपारा प्रभाग 13 मधील नाळा येथील तलावाला धार्मिक महत्त्व असून येथील गणेश घाटावर पूर्वापार गणेश विसर्जन केले जाते. मात्र सध्या तलाव प्रदूषित झाला आहे. तलावातील पाण्याला जलपर्णीच्या विळख्यात पडला आहे. संपूर्ण पाणी दूषित झाले असून मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले आहेत. तलावाच्या काठी नागरी वस्ती असल्यामुळे दूषित पाण्याची व मेलेल्या मासळीची सर्वत्र दुर्गंध पसरल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
नाळा तलावामध्ये प्रदूषणामुळे मोठ्या संख्येने मासे मृत झाले आहेत. या घटनेनंतर गणेश तलावमध्ये निर्माल्य आणि कचरा टाकण्यास निर्बंध घालण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे. वसई-विरार आरोग्य विभाग व पालिका स्वच्छता विभागाने तलावाची साफसफाई व परिसर निर्जंतुकीकरण करून घ्यावा तसेच मृत माशांची विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत जागृती म्हात्रे यांनी नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवून तसे निवेदन पालिका प्रशासनाला दिले.




























































