
चंदिगड येथील आयडीएफसी फर्स्ट बँकेतील घोटाळ्याप्रकरणी आता संबंधितांना अटक करण्यात आली आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेतील सरकारी खात्यांमध्ये ५९० कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार आरोपींना अटक केली. सरकारी खात्यांशी संबंधित ५९० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने, ऋषभ ऋषी, अभय, स्वाती आणि अभिषेक यांना अटक केली आहे. हे सर्व पैसे सरकारी खात्यात परत आले असले तरी बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सरकारी खात्यांमधून स्वस्तिक देश इंडिया फर्म या काल्पनिक कंपनीत ३०० कोटी रुपयांचा व्यवहार करण्यात आला होता.
न्यायालयाने आरोपी ऋषभ ऋषी आणि अभय यांना १४ दिवसांची कोठडी मंजूर केली, तर इतर दोघांना सात दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने सर्व आरोपींना सात दिवसांची कोठडी मंजूर केली. हरियाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीजीपी डॉ. एएस चावला यांनी बुधवारी या प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेतली. डीजीपी डॉ. एएस चावला यांनी सांगितले की, चंदीगडमधील सेक्टर-३२ आयडीएफसी बँकेत हा घोटाळा झाला आहे. या प्रकरणाच्या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुख्य सूत्रधार रिभव ऋषी आणि अभय यांची चौकशी सुरु आहे.
अटक केलेल्या चार आरोपींपैकी तीन आरोपींचे प्रतिनिधित्व करणारे बचाव पक्षाचे वकील यवनीत ढकाल यांनी सांगितले की, त्यांच्या अशिलांना अटक करण्यापूर्वी कोणतीही सूचना किंवा माहिती देण्यात आली नव्हती. त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अटकेपूर्वी नोटीस देण्यात याव्यात. नोटीसा या देण्यात आल्या नव्हत्या. जर त्यांना नोटीस देण्यात आली असती तर ते त्यांची बाजू मांडू शकले असते.
अभिषेक सिंगला, अभय, स्वाती आणि ऋषभ हे या घोटाळ्यात सहभागी होते. डीजीपी चावला यांनी सांगितले की, ऋषभ आणि ऋषीच्या सांगण्यावरून अभय कुमारने स्वाती आणि अभिषेक यांच्या नावाने बनावट कंपन्या सुरू केल्या. हरियाणामध्ये स्वाती सिंगला आणि अभिषेक सिंगला यांना व्यवसाय भागीदार म्हणून घोषित करून अनेक बनावट कंपन्या तयार करण्यात आल्या होत्या.
ऋषभ आयडीएफसी बँकेत मॅनेजर होता आणि अभय रिलेशनशिप मॅनेजर होता. मोहालीतील खरार येथील अभय हा बँकेत कर्मचारी होता आणि त्याने त्याची बहीण स्वाती सिंगला आणि तिचा पती अभिषेक सिंगला यांना या योजनेत सहभागी करून घेतले होते. अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये घोटाळा केलेल्या, हर्षद मेहताला त्यांनी आदर्श मानले होते. मेहताने १९९२ मध्ये ५,००० कोटी रुपयांचा शेअर बाजार घोटाळा घडवून आणला. तपासात असे दिसून आले की, सरकारी खात्यांमधून स्वस्तिक देश इंडिया फर्म या काल्पनिक कंपनीला ३०० कोटी रुपयांचे व्यवहार करण्यात आले होते.






























































