म्हसळ्याचे ग्रामीण रुग्णालय व्हेंटिलेटरवर, कायमस्वरूपी डॉक्टरांचा तुटवडा; कंत्राटी डॉक्टर टिकेनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैद्यकीय अधीक्षकांसह महत्त्वाची पाच पदे रिक्त असल्यामुळे म्हसळ्याचे ग्रामीण रुग्णालय व्हेंटिलेटरवर आले आहे. वैद्यकीय सेवा ढेपाळल्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत असून त्यांना उपचारासाठी अन्य ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे. या रुग्णालयाची उभारणी होऊन तब्बल १२ वर्षे उलटून गेले असले तरी महत्त्वाची पदे भरली गेली नाहीत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

म्हसळा तालुक्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात दररोज सरासरी किमान ११० रुग्ण उपचारासाठी येत आहेत. मात्र रुग्णालय स्थापनेपासून आतापर्यंत वैद्यकीय अधीक्षक (वर्ग-१) हे महत्त्वाचे पद रिक्तच आहे. याशिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे रिक्त असून सध्या केवळ एकच कायमस्वरूपातील वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. उर्वरित जागा रोहा येथून प्रतिनियुक्तीवर डॉक्टर पाठवून भरल्या जात आहेत. रुग्णालयाचे उद्घाटन २५ मे २०१४ रोजी झाले. मात्र १२ वर्षांच्या कालावधीतही महत्त्वाची पदे भरली गेली नाहीत. रिक्त असलेल्या पदांमध्ये वैद्यकीय अधीक्षक (वर्ग-१), दंतचिकित्सक (वर्ग-२), कनिष्ठ लिपिक (वर्ग-३), क्ष-किरण तंत्रज्ञ, सहाय्यक अधीक्षक आदींचा समावेश आहे.

कर्मचारी-नातेवाईकांमध्ये वाद

पर्यटन वाढल्याने अपघात व जखमींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मात्र गंभीर रुग्णांना वारंवार इतर रुग्णालयात पाठवावे लागत असल्याने नातेवाईकांत नाराजी वाढत आहे. प्रसूती सेवा सातत्याने उपलब्ध नसल्याच्याही तक्रारी आहेत. अनेक वेळा रुग्णांसोबत आलेले नातेवाईक ‘कायम डॉक्टर का नाहीत?’ असा सवाल उपस्थित करत वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी वाद घालत असल्याचे प्रकारही घडत आहेत