व्हीएसआर कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा, रोहित पवार यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन दिवसांपूर्वी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या अहवालाचा आधार घेत आम्ही एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. बुधवार, 25 फेब्रुवारी 2026 रोजी पदाधिकारी आणि समर्थकांसह ते मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, काहींनी “मुंबईत एफआयआर दाखल करता येणार नाही” अशी हरकत घेतल्याने तक्रार स्वीकारली गेली नाही. झिरो एफआयआर संकल्पनेनुसार मुंबईत तक्रार नोंदवता येऊ शकते, तरीही ती नाकारण्यात आल्याचा आरोप करत आज ते बारामती पोलीस ठाण्यात आले.

रोहित पवार म्हणाले की, डीजीसीएच्या अहवालात व्हीएसआर विमान कंपनीवर ठपका ठेवण्यात आला असून त्याच आधारे एफआयआरची मागणी केली जात आहे. “दादा ज्या लेअर जेट प्रकारातील विमानाने बारामतीला गेले, ते नॉन-कम्प्लायन्समध्ये होते. कंपनीने ही बाब मान्यही केली आहे. मग अशा स्थितीत अजित दादांना तेच विमान का देण्यात आले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात निष्काळजीपणाला जबाबदार असलेल्या व्हीएसआर कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी त्यांची मागणी आहे.

डीजीसीएच्या 24 फेब्रुवारीच्या आदेशानुसार व्हीएसआरची पाचही विमाने ग्राऊंड करण्यात आली आणि त्यांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली. “पाचही विमाने ग्राऊंड केली असताना अजित पवारांना संबंधित विमान कसे देण्यात आले? ही चूक होती की मुद्दाम केलेली कृती?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, “अजित पवारांचे विमान सुरक्षित असल्याचा अहवाल कोणी तयार केला आणि त्यावर सह्या कोणी केल्या?” याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

विमान उड्डाणास सक्षम आहे की नाही, हवामानाची दृश्यमानता योग्य आहे की नाही, यासह इतर सर्व तांत्रिक बाबींची जबाबदारी ‘Arrow’ नावाच्या कंपनीकडे असल्याचे त्यांनी सांगितले. एका व्हॉट्सअ‍ॅप चॅटनुसार ‘पवार’ नावाच्या व्यक्तीने हवामान योग्य असल्याचे कळवले आणि त्यानंतर अजित दादांच्या पीएने त्यांना माहिती दिल्यावर ते कारमधून विमानात गेले, असा दावा रोहित पवार यांनी केला. संबंधित कंपनीवर कारवाई व्हावी, अशीही त्यांची भूमिका आहे.

पोलिसांनी “अ‍ॅक्सिडेंट रिपोर्ट नोंदवला असल्यामुळे एफआयआर करता येणार नाही” असे सांगितल्याचा दावा करत रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. “अपघाताचा केवळ Accident Report झाला आहे; मात्र गुन्हेगारी दृष्टीकोनातून तपास का होत नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “कबुतरांची चोरी झाली तरी एफआयआर होतो, मग या अपघाताबाबत का नाही?” असा टोला त्यांनी लगावला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रत्येक नागरिकाला एफआयआर दाखल करण्याचा अधिकार आहे, असे सांगत “आमचा हक्क का नाकारला जातोय?” असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. विमानासंदर्भातील माहिती असलेले व्हॉट्सअ‍ॅप चॅट यापूर्वीच सादर केल्याचे सांगत, त्या गटात काही वरिष्ठ अधिकारी होते आणि त्यांच्या दुर्लक्षामुळेच हा अपघात घडला असावा, असा आरोप त्यांनी केला. संबंधितांवर कारवाई व्हावी आणि योग्य गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा ठामपणे मांडली.