
विक्रोळी पूर्व कन्नमवार नगरात असलेल्या क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा कोणताही विचार नसल्याचे राज्य सरकारकडून आज विधानसभेत स्पष्ट करण्यात आले. शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी तारांकित प्रश्नाद्वारे हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता.
मुंबई महानगरपालिकेच्या क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयात विक्रोळी, कन्नमवार नगर, टागोर नगर, कांजुरमार्ग आणि परिसरातील हजारो गोरगरीब रुग्ण उपचारांचा लाभ घेतात. आता ते रुग्णालय पाडून नवीन इमारत उभारली जात आहे. त्या रुग्णालयाचे खासगीकरण करून ते एस कॉर्पोरेशन या संस्थेला चालवायला दिले जाणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम आहे. खासगीकरणाचा निर्णय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे खासगीकरण रद्द करण्यासाठी शासनाने काय कार्यवाही केली? असा प्रश्न सुनील राऊत यांनी उपस्थित केला.
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावर उत्तर दिले. 1995 मध्ये हे रुग्णालय बांधले गेले. त्या वेळी रुग्णालयाची क्षमता 103 खाटांची होती. आता ते 500 खाटांचे करण्यासाठी काम सुरू आहे. 9560 चौरस मीटर क्षेत्रावर हे रुग्णालय आहे. त्यातील 4769 चौरस मीटर क्षेत्र म्हाडाच्या अखत्यारीत आहे. त्या जागेसाठी सरकारने म्हाडाला 24 कोटी रुपये दिले आहेत. नव्या रुग्णालयात 3 विंग उभारल्या जाणार आहेत. मुख्य इमारत 14 मजल्यांची असेल तर वसतीगृह आणि प्रशासकीय इमारत 21 मजली असेल. आतापर्यंत 12 टक्के काम पूर्ण झाले आहे. बांधकामावर एकूण 706 कोटी रुपये खर्च येणार असून जून 2028 पर्यंत रुग्णालय पूर्ण बांधून तयार होईल असे राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.



























































