अनिकेत कोथळेच्या मृत्यूला कामटेसह साथीदारच जबाबदार; ऍड. उज्ज्वल निकम, अंतिम युक्तिवादास प्रारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या बेदम मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाला. त्याला कामटेसह साथीदार जबाबदार आहेत, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी आज जिल्हा न्यायालयासमोर केला.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पडवळ यांच्या न्यायालयात आजपासून अनिकेत कोथळे खून खटल्याच्या अंतिम युक्तिवादास सुरुवात झाली. ऍड. निकम यांनी घटनाक्रम, गुन्हा लपवण्याचा प्रयत्न आणि पुरावे, याविषयी युक्तिवाद केला. पुढील दोन दिवस युक्तिवाद होणार आहे.

6 नोव्हेंबर 2017 रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांना बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या साथीदारांनी अमानुष मारहाण केली. त्यात अनिकेतचा मृत्यू झाला. त्याला जबाबदार हे सारे आहेत, असा युक्तिवाद ऍड. निकम यांनी करत तीन भागांत वर्गीकरण केले.

पहिल्या भागात हा गुन्हा उघडकीस कसा आला, हे न्यायालयासमोर मांडले. त्यानंतर दुसऱया भागात हा गुन्हा लपवण्यासाठी संबंधित कामटे व साथीदारांनी कसे प्रयत्न केले, हे सांगण्यात आले. यावेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी काही वाक्यांवर आक्षेप नोंदवला. हा आक्षेप ऍड. निकम यांनी फेटाळून लावला. त्यानंतर तिसऱया भागात अनिकेत कोथळे याच्या मृतदेहाचे अवशेष त्याचेच आहेत, हे न्यायवैद्यक तज्ञांकडून न्यायालयात सिद्ध करण्यात आले. त्या संदर्भातील जंत्री आज न्यायालयासमोर देण्यात आली. त्यानंतर तीन मुद्दय़ांवर आज पुन्हा ऍड. निकम यांनी प्रतिपादन केले. त्यात हा गुन्हा कसा उघडकीस आला, गुन्हा लपवण्यासाठी दोघेजण पळून गेल्याची काल्पनिक कथा कामटेने कशी रचली आणि प्रत्यक्ष साक्षीदार अमोल भंडारे याच्यावर कसे दडपण टाकले होते, याची माहिती तपास अधिकारी राजन माने, तत्कालीन उपनिरीक्षक रोहित चौधरी यांच्या पुराव्याचा युक्तिवाद करण्यात आला.

पुढील दोन दिवसांत आणखी युक्तिवाद केला जाणार आहे. सीआयडीच्या अधीक्षक श्रीमती देसाई, अपर पोलीस अधीक्षक विजय तामाणे, उपअधीक्षक प्रमोद नलवडे, मुख्य तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी सरकार पक्षाला मदत केली. या गुह्यातील संशयित बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झीरो पोलीस झाकीर पट्टेवाले यांना न्यायालयात आणले होते. यातील एक संशयित अरुण टोणे याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे.

सीआयडीचा योग्य तपास

बचाव पक्षाच्या वकिलांनी निरीक्षक राजन माने आणि उपनिरीक्षक रोहित चौधरी यांचा उलटतपास घेतला होता. त्यात साक्षीदार वेळेत का तपासले नाहीत, या अनुषंगाने उलटतपासणी केली होती. त्या सर्व मुद्दय़ांवर ऍड. निकम यांनी युक्तिवाद केला. सीआयडीने योग्य पद्धतीने तपास केला असून, त्याबाबतची माहिती न्यायालयासमोर पुराव्यानिशी सादर केली.