
विद्यार्थिनीच्या बँक खात्याचा वापर करून उत्तराखंडमधील नागरिकांची तब्बल २ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा सायबर घोटाळा डोंबिवलीत उघड झाला आहे. आपल्या खात्यात संशयास्पद व्यवहार झाल्याची तक्रार करूनही कर्नाटका बँकेच्या डोंबिवली शाखा व्यवस्थापनाकडून आणि पोलिसांकडून गंभीर दखल घेतली जात नसल्याचा आरोप निधी तिवारी (२०) हिने केला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे निधीने लेखी तक्रार करून या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे. तीन महिन्यांपूर्वी चांदनी सिंह या मैत्रिणीने तिचे कर्नाटका बँकेत खाते उघडून दिले. काही दिवसांतच आपल्या बँक खात्यातून संशयास्पद व्यवहार होत असल्याचे लक्षात आल्यानंतर निधीने चांदनी सिंह हिला विचारणा केली. मात्र तिने काही सांगण्यास टाळाटाळ केली.
असा झाला स्कॅम
चांदनी सिंह या मैत्रिणीने आपण आरबीएल बँकेत नोकरी करत असल्याचे सांगत निधीचे कर्नाटका बँकेच्या डोंबिवली पूर्व शाखेत खाते उघडून दिले. खाते उघडताना बँकेचे ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी मदत करावी लागेल असे सांगून तिने निधीकडून कागदपत्रे घेतली होती. काही दिवसांनंतर निधीच्या खात्यात २ कोटी ६० लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले. इतकेच नव्हे तर तिच्या नावावर अन्य तीन बँकेतही खाती उघडण्यात आली असून त्या ठिकाणीही घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे


























































