तरुणांचे मानसिक आरोग्य धोक्यात; जागतिक क्रमवारीत हिंदुस्थान 60व्या स्थानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाकरता एक चिंताजनक बाब समोर आली आहे. ‘ग्लोबल माइंड हेल्थ 2025’ या आंतरराष्ट्रीय अहवालानुसार, तरुणांमध्ये (18 ते 34 वयोगट) मानसिक आरोग्याबाबतीत हिंदुस्थान जगात 60 व्या क्रमांकावर पोहचला आहे. या अहवालात जगभरातील 84 देशांचा अभ्यास करण्यात आला असून, हिंदुस्थानातील तरुणांचा ‘माइंड हेल्थ कोशंट’ (MHQ) केवळ 33 इतका नोंदवण्यात आला आहे.

या अभ्यासाअंतर्गत एक धक्कादायक गोष्ट उघड झाली आहे. देशातील तरुणांचा MHQ स्कोअर 33 आहे, तर 55 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांचा MHQ स्कोअर 96 इतका नोंदवण्यात आला आहे. ही आकडेवारी पाहता जागतिक क्रमवारीत ज्येष्ठ नागरिक 49 व्या स्थानी आहेत. यावरून असे दिसून येते की, तरुण पिढीच्या तुलनेत जुनी पिढी मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि स्थिर आहे.

मानसिक आरोग्य बिघडण्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे

  • स्मार्टफोन हातात येण्याचे सरासरी वय 16.5 वर्षे आहे. स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुलांच्या एकाग्रतेवर आणि भावनिक नियंत्रणावर परिणाम होत आहे.
  • तरुणांमध्ये ‘अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड’ (UPF) खाण्याचे प्रमाण 44 टक्के इतके आहे. संशोधनानुसार, चुकीच्या आहारामुळे मेंदूच्या आरोग्यावर आणि मूडवर विपरीत परिणाम होतो.
  • केवळ 64 टक्के तरुणांना आपल्या कुटुंबाशी जवळीक वाटते, तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये हे प्रमाण 78 टक्के आहे. कुटुंबाकडून मिळणारा पाठिंबा कमी झाल्यामुळे तरुण एकटे पडत आहेत.
  • करिअरची स्पर्धा, आर्थिक अनिश्चितता आणि सामाजिक अपेक्षांमुळे तरुणांच्या मानसिक लवचिकतेवर (Resilience) परिणाम होत आहे.

हा अहवाल केवळ आरोग्यापुरता मर्यादित नसून तो देशाच्या उत्पादकतेशी संबंधित आहे. तरुणांचे मानसिक स्वास्थ्य ढासळल्यास त्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामाजिक रचनेवर होऊ शकतो.